इंदूर: भारत आणि बांगलादेश यांच्यात येत्या शुक्रवारपासून कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानावर होत असलेल्या पहिल्याच दिवस-रात्र कसोटीसाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ कसून सराव करत आहे. दोन्ही संघ आज (मंगळवार) कोलकात्याला रवाना होतील. येथील पहिला कसोटी सामना तीन दिवसातच संपला तरीही कोहली आणि कंपनीचा मुक्काम इथेच होता.
दररोज संध्याकाळी खेळाडू याच मैदानावर प्रकाशझोतात सराव करत होते. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेला खास विनंती केल्यामुळे दोन्ही संघांसाठी सरावासाठी नियोजन करण्यात आले. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण तसेच दिवस-रात्र झालेल्या देशांतर्गत सामन्यात खेळण्याचा अनुभव असलेला यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघातील खेळाडूं सराव केला.
रोहितला विश्रांती मिळणार
डिसेंबर महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यासाठीच नव्हे तर मोसमातील विविध मालिकासाठी रोहितची तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे रोहितला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकासाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान विजय शंकरला दुखापत झाल्यानंतर बदली खेळाडू म्हणून मयांकला इंग्लंडमध्ये पाठवण्यात आले होते. 2023 मध्ये भारतात होणाऱ्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपर्यंत धवन संघातील स्थान टिकवू न शकल्यास मयांक सलामीला उपलब्ध राहील.
मयांकला लागणार लॉटरी
भारताचा द्विशतकवीर फलंदाज मयांक अग्रवालने कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता वाढली आहे. असे झाले तर मयांकला एकप्रकारे लॉटरीच लागणार आहे.
अग्रवालच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे एकदिवसीय संघाची निवड करताना त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, असे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्राने दिले आहेत. अर्थात निवड समितीचे सदस्य ही शक्यता नाकारत असले तरी या आठवड्यात समितीची बैठक होईल व त्यात कर्णधार विराट कोहलीने मयांकच्या समावेशाचा आग्रह धरला तर समितीला त्याची मागणी पूर्ण करावीच लागेल. या मालिकेसाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात येणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे त्यामुळे मयांकच्या समावेशाची शक्यता वाढली आहे.
भारतीय संघाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी ताजातवाना राहावा यासाठी रोहितला विश्रांती दिली तरच मयांकला संधी मिळेल. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ 5 टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने, तर दोन कसोटी सामने खेळणार आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान विजय शंकरला दुखापत झाल्यामुळे त्यावेळी मयांकला संघात निवडले होते.