केपटाऊन -बीसीसीआय, अध्यक्ष सौरव गांगुली व नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा यांच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी बदली कर्णधार व एकेकाळचा मित्र असलेला लोकेश राहुल चक्क विराट कोहलीपासून अंतर राखताना दिसत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची फलंदाजी सुरु असताना कोहली व राहुल ड्रेसिंगरुममध्ये होते मात्र, त्यांच्या मध्ये शिखऱ धवन बसला होता. यावेळी अनेकदा कॅमेरा या दोघांकडे नजर ठेवून होता. त्यात कोहली व राहुल एकमेकांकडे पाहातही नव्हते तसेच त्यांच्यात एक शब्दही संवाद होत नसल्याचे स्पष्ट दिसत होते.
या लढतीत राहुल लवकर बाद झाला तर कोहलीने दमदार अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्यावेळी केवळ औपचारीकता म्हणून टाळ्या वाजवल्याचे दिसत होते. तसेच दीपक चहरने अर्धशतक साकार केल्यावर कोहलीने उभे राहून त्याचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदनही केले मात्र, यावेळी राहुल कोहलीकडे कटाक्षही टाकत नव्हता व चहरच्या अर्धशतकावर केवळ हात दाखवला.
भारतीय संघात आता राहुल व कोहली या एकेकाळच्या जीवलग मीत्रांमध्ये दरी तयार झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोहलीच्या जवळ राहिलो तर बीसीसीआय, अध्यक्ष गांगुली व रोहित यांच्याविरोधात गेल्याचे दिसेल अशी भीती राहुलला वाटत असल्याचेही दिसून येत आहे. या सगळ्यांच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठीच राहुलची ही उठाठेव असल्याचेही दिसत आहे. राहुलचे हे दुर्लक्ष चाहत्यांनी पाहिल्यावर त्याला ट्रोलही करण्यात येत आहे. ज्या कोहलीमुळे आज तू या स्थानावर आहेस ते इतक्या लवकर कसा विसरलास, असा सवाल चाहत्यांनी सोशल मीडियावर राहुलला विचारला आहे.