प्रमुख खेळाडूंनाच मानधनाची प्रतीक्षा

मुंबई – जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असा नावलौकिक असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कर्णधार विराट कोहलीसह अन्य प्रमुख खेळाडूंनाच गेल्या 10 महिन्यांपासून मानधन दिलेले नसल्याचे समोर आले आहे. अर्थात, याप्रकरणी लवकरच बैठक होणार असून त्यानंतर खेळाडूंचे मानधन दिले जाईल, असे उत्तर बीसीसीआयमधील सूत्राने दिले आहे.

करोनाचा फटका जागतिक क्रिकेटलाही बसलेला असताना बीसीसीआय मात्र, हजारो कोटींचा नफा मिळवून देत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या आयोजनात गुंतलेली आहे. मात्र, त्याचवेळी कोहलीसह मंडळाच्या विविध ग्रॅडमध्ये करारबद्ध असलेल्या खेळाडूंनाच अद्याप मानधन मिळालेले नाही. देशातील 27 खेळाडू मानधन श्रेणीशी करारबद्ध आहेत. गेल्या वर्षीपासून या खेळाडूंनी 2 कसोटी, 9 एकदिवसीय सामने तसेच 8 टी-20 लढती खेळलेल्या आहेत.

एकूण 4 श्रेणींमध्ये विविध खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले असून कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह यांना वर्षाला 7 कोटी रुपये मानधन दिले जाते. अन्य तीन श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे 5, 3 व 1 कोटी मानधन दिले जाते. त्याबरोबरच कसोटी, एकदिवसीय व टी-20 सामन्यांसाठी प्रत्येक खेळाडूला प्रत्येक सामन्यासाठी श्रेणीनुसार अनुक्रमे 15, 6 व 3 लाख रुपये सामना रक्कम दिली जाते.
सध्या बीसीसीआयच्या खात्यात 5 हजार 500 कोटी रुपये जमा असून 2 हजार कोटींच्या ठेवीही आहेत. मात्र, तरीही बीसीसीआयने गेल्या 10 महिन्यांपासून खेळाडूंचे मानधन थकवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.