कोचरेवाडीचा रस्ता खचला 

बांधकाम विभागाच्या डोळ्यावर पट्टी

चाफळ – गत महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे चाफळ विभागातील खोनोली ते कोचरेवाडी दरम्यान असणाऱ्या नाळवा नावाच्या शिवारानजीकचा रस्त्याला साधारणपणे तीस ते पस्तीस फूट लांब आणि एक फूट खोल चर पडून डांबरीकरण पूर्णपणे खचल्याने या मार्गावरील वाट बिकट बनली आहे.

कोचरेवाडी गाव डोंगराच्या मध्यावर वसलेले आहे. येथील शेतकरी शेतीपूरक असा दुग्धव्यवसाय करतात. प्रत्येक कुटुंबाचे अर्थशास्त्र हे शेतीपूरक दुग्धव्यवसायावर अवलंबून आहे. या गावाला जाणारा हा एकमेव घाट रस्ता असून अतिवृष्टीने हा रस्ता खचून त्याचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे या गावातील वाहतूक बंद झाल्याने डेअरी वाहतूकही काही दिवसांपासून ठप्प झाली आहे. परिणामी गावातील दूधाचे संकलन बंद झाल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्ताच खचल्यामुळे शेतकऱ्यांपुढेही मोठा पेच निर्माण झाला आहे.

खोनोली ते कोचरेवाडी या डोंगर रस्त्यावरील नाले सुस्थितीत असणे अत्यंत गरजेचे असताना संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या घाटामध्ये एका धोकादायक वळणावर डोंगरातून येणारे गाळमिश्रीत पाणी सरळ डांबरी रस्त्यावर आल्याने तेथील डांबरीकरण उध्वस्त होण्याच्या स्थितीत असून भविष्यात एखाद्या गंभीर अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही.

या घाटामध्ये वळणावरती कसलेच सूचना अगर दिशादर्शक फलक नसल्यामुळे हा मार्ग अपघाताला निमंत्रणच देत आहे. या गोष्टींना सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीतच खोनोली-कोचरेवाडी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असतानाही कोचरेवाडीकरांच्या जीवाशी चालवलेला हा खेळ एखादा जीव गेल्यानंतर थांबणार की काय? डोळ्यावर पट्टी बांधून बसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला नेमकी केव्हा जाग येणार? असा संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.