“खडकवासला’ सांडपाण्याच्या विळख्यात

पाठपुरावा करूनही स्थानिक प्रशासन, आमदारांकडून उपाययोजना होईनात

हॉटेल व्यावसायिकांकडून प्रदूषण

खडकवासला धरण परिसरात डोणजे, गोऱ्हेगाव बुद्रुक, गोऱ्हेगाव खुर्द, खानापूर अशीबरीचशी लहान मोठी गावे आहेत. याव्यतिरिक्त पुण्यातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक सिंहगड किल्ला देखील याच भागात असल्याने पर्यटकांची नेहमीच या भागात वर्दळ असते. यामुळे हॉटेल व्यवसायही जोरात असतो. त्यामुळे गावातील दैनंदिन वापराव्यतिरिक्त हॉटेल व्यावसायिकांकडून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यामुळे धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

पुणे – खडकवासला परिसरात गावांमधील सांडपाणी थेट धरणाच्या पाण्यात सोडले जात असल्याने प्रदूषण वाढत असून आरोग्याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (मिलिट) ही लष्करी संस्था सरसावली असून, लवकरच सांडपाण्याच्या समस्येवर उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.
पुणेकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा एक मुख्य स्रोत म्हणजे खडकवासला धरण आहे. पण, हे धरण प्रदूषणाच्या विळख्यात अडकले असून, धरण परिसरातील गावांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता धरणाच्या पाण्यात सोडले जात आहे.

खडकवासला धरणाचे पाणी मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (मिलिट), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्‍नॉलॉजी आणि नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी या लष्करी संस्थांनाही पुरविले जाते. त्यामुळे या जलप्रदूषणाचा परिणाम लष्करी संस्था आणि तेथील अधिकाऱ्यांच्या आरोग्यावरही होतो. हीच बाब लक्षात घेत खडकवासला येथील “मिलिट’ संस्थेने सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत या गावांमधील सांडपाणी प्रक्रियेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार प्रक्रिया प्रकल्प उभारणे, जनजागृती करणे तसेच काही प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, एकीकडे सांडपाणी सोडण्याचे प्रमाण वाढत असताना, स्थानिक प्रशासन यावर कोणतीही उपाययोजना करत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

गोऱ्हेगाव येथे दिवसाला 50 हजार लिटर सांडपाण्याची निर्मिती होते. तर खडकवासला परिसरातील सर्व गावांचे मिळून सुमारे दोन ते तीन लाख लिटर सांडपाणी निर्माण होते. मात्र, प्रक्रियाप्रकल्पाच्या अभावामुळे हे पाणी थेट धरणाच्या पाण्यात अथवा खडकवासला बॅकवॉटरमध्ये सोडले जाते. याबाबत महापालिका, परिसराचे आमदार भीमराव तापकीर, जिल्हा परिषद अशा सर्वच स्तरावर चर्चा करून, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची व्यवस्था करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.

– सुशांत खिरीड, उपसरपंच, गोऱ्हे बु.

सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत डोणजे गाव दत्तक घेतले आहे. या गावातील सोयीसुविधांबाबत काम करत असतानाच आम्हाला येथील सांडपाण्याचा प्रश्‍नाबाबत माहिती मिळाली. खडकवासला धरणाचे पाणी आमच्याही संस्थांमध्ये पुरविले जात असल्याने ते पाणी स्वच्छ असावे, ही आमचीदेखील जबाबदारी आहे असे मानून संस्थेतर्फे सांडपाणी प्रक्रियेबाबत काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये प्रक्रिया प्रकल्प उभारणीपासून जनजागृतीपर्यंत अश असर्वच स्तरांवर संस्था काम करणार आहे. सध्यस्थितीत हे काम प्राथमिक टप्प्यात आहे.

– विंग कमांडर समीत वागळे, समन्वयक, दत्तक गाव योजना, “मिलिट’.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.