जाणून घ्या, तिळाचे औषधी महत्त्व व उपयोग

पुणे – तीळ ही जशी तेल बी आहे तशीच ती एक औषधी वनस्पती आहे. तिळाचे दोन प्रकार असतात. एक पांढरे तिळ, काळे तिळ. दोन्ही औषधी आहे. गोडीला तुरट, काहीसे कडवट, उष्ण, स्निग्ध, तीक्ष्ण, वातशामक गुणाचे असतात. तिळात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. तीळ बलदायी व पोषण करणारे असतात.

तिळाचे अनेक औषधी उपयोग
लहान मुलांची चांगली वाढ होण्यासाठी त्यांना आहारात तिळाचे पदार्थ द्यायला हवेत. तिळ हाडे बळकट करतात. जर डोक्‍यात चाई पडली असेल किंवा डोक्‍यात जखम झाली असेल तर तीळ आणि गोखरू वाटून मध आणि तूपात खलून तयार झालेल्या मिश्रणाचा लेप डोक्‍याला लावावा. यामुळे केस उत्तम वाढतात, चाई बरी होते. रोज सकाळी थोडेसे पांढरे तीळ दाताखाली चावून-चावून खावेत त्यामुळे शरीराला शक्‍ती व पोषण मिळते, दात मजबूत होतात. दुखतही नाहीत आणि पडतही नाहीत. तिळाच्या सेवनाने स्नायू, कान, जननेंद्रिय, त्वचा, डोळे, पकवाशय, मूत्राशय, रक्‍तवाहिन्या म्हणजेच सर्व शरीरभर वंगण होते. एक प्रकारची स्निग्धता निर्माण होते.

तीळ तेल
तिळाचे शुद्ध तेल औषधी असते. ते वातशामक आहे. सूक्ष्म, स्निग्ध, केसांना उपयुक्‍त,स्त्रोतोगामी, मूत्रनाशक, कृमीनाशक असते. तीळ तेलामुळे मसाज तंत्राला संजीवनी मिळाली आहे. तीळ तेलाचे मालिश शरीराला बल देते. शरीरातील रक्‍ताभिसारण सुधारते. शूष्क मांसपेंशींना बल मिळते. तीळ तेलाचे अनेक उपयोग आहेत. केसांना लावले तर कोंडा जातो, केस वाढतात, काळे होतात. तीळ तेलात मेण व सैंधव घालावे व भेंगांना लावावे. पोटात जंत झाले असता तिळ तेल घेतात. लहान मुल रात्री बिछाना ओला करत असतील तर त्यामुलाला तीळ खायला द्यावे या विकारातून तो बरा होईल. तीळ कुटाचा समावेश भाज्यांमध्ये करावा, तसेच तिखट तिळकुट म्हणजेच तिळाची चटणी रोज जेवणात घ्यावी.

सांधे दुखीवर काळ्या तिळाचे तेल उपयुक्‍त आहे. तिळाची झाडे बुटकी असतात. त्यांना पिवळ्या फुलांचा बहर येतो नंतर बारीक-बारीक तीळ लागतात. थंडीच्या दिवसात तिळाचे पदार्थ खाल्ले असता शरीरात उष्णता निर्माण होते म्हणूनच तिळगूळ, तिळाच्या वड्या, तिळाच्या पोळ्यांचा आहारात थंडीच्या दिवसात समावेश केला जातो. जेवणानंतर अन्न पचनासाठी चिमूटभर भाजलेले तीळ व खोबऱ्याचा चुरा यांचे मिश्रण खावे. मुखशुद्धीसाठी तिळाला लिंबाची, डाळींबाची भावना देतात आणि किंचित सैंधव घालून ज्यावेळी अरूची निर्माण होते, तेव्हा खातात. काळे आणि पांढरे असे दोन्ही प्रकारचे तीळ औषधी आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.