Bashar al-Assad’s net worth: इस्लामिक बंडखोरांनी सीरियाची राजधानी दमास्कसह देशातील इतर शहरं ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना देश सोडून पळून जावे लागले होते. अल-असद यांनी सध्या रशियामध्ये आश्रय घेतला आहे. सीरियावर अनेक दशकं राज्य करणाऱ्या असद कुटुंब हे कोट्यावधीच्या संपत्तीचे मालक आहे.
बशर अल-असदकडे कोट्यावाधीची संपत्ती
सीरियासोडून रशियाला पळालेल्या राष्ट्राध्यक्ष बशर अल-असदकडे कोट्यावधीची संपत्ती आहे. असद कुटुंबाकडे जवळपास 5 दशक सीरियाची सत्ता होती.
रिपोर्टनुसार, बशर अल-असदकडे तब्बल 200 टन सोने आहे. याशिवाय, 16 अब्ज डॉलर आणि 5 अब्ज युरो एवढे चलन आहे. या चलनाची रुपयांमध्ये किंमत तब्बल 1.80 लाख कोटी रुपये आहे. सीरियाच्या बजेटपेक्षाही कितीतरी अधिक पटीने संपत्ती अल-असदकडे आहे. याशिवाय, आलिशान घर,लग्जरी गाड्या व इतर संपत्ती देखील आहे.
असद कुटुंबाच्या नावे रशियामध्ये 2 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. असदकडे मॉस्कोमध्ये लग्झरी अपार्टमेंट्स आहेत. तसेच, असद व त्यांच्या पत्नीच्या नावाने वेगवेगळी बँक खाती, कंपन्या व रिअल इस्टेटमध्ये 2 अब्जपेक्षा अधिक गुंतवणूक आहे. कुटुंबाकडे रशियामध्ये 40 पेक्षा अधिक अपार्टमेंट्स असून, याची किंमत 40 मिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे.
50 वर्षांपासून सीरियावर असद कुटुंबाची सत्ता
इस्लामिक बंडखोरांनी मागील 50 वर्षांपासून सीरियामध्ये एकहाती सत्ता बाळगणाऱ्या असद घराण्याची एकाधिकारशाही समाप्त केली. बशर अल-असदचे वडील हाफिज हे 29 वर्ष देशाचे प्रमुख होते. मोहम्मद अल बशीर यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने राष्ट्राध्यक्ष असद यांना सत्तेतून हटवले आहे. यासोबतच, देशात 2011 पासून सुरू असलेले गृहयुद्ध देखील समाप्त झाले आहे.