Share Market Crash | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणाऱ्या सर्व स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. देशांतर्गत बेंचमार्क इंडेक्स असलेले सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले आहेत. सलग 5व्या दिवशी बाजारात घसरण सुरू आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत सेन्सेक्स 1.33 टक्क्यांनी घसरून 76,284.36 वर होता, तर निफ्टी 1.38 टक्के घसरून 23,059.25 अंकांवर व्यवहार करत होता.
निफ्टीमध्ये जवळपास 370 अंकांची घसरण होऊन इंडेक्स 23000 हजारांवर आला आहे. तर सेन्सेक्समध्ये जवळपास 1200 अंकांची घसरण दिसून आली आहे. या प्रचंड घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 10 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य आज 9.87 लाख कोटींनी घटून ते 407.85 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
निफ्टी मिडकॅप इंडेक्समध्ये 1700 अंकांची घसरण झाली आहे. या वर्षी आतापर्यंत हा इंडेक्स सुमारे 11% घसरला आहे. निफ्टी स्मॉलकॅपमध्येही 600 अंकांहून अधिक घट झाली आहे. BSE स्मॉलकॅप इंडेक्स गेल्या 2 महिन्यांत 17% पर्यंत घसरला आहे. ऑटो, मीडिया, फार्मा, PSU बँक, हेल्थकेअर आणि ऑईल-गॅस क्षेत्रामध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.
निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्समधील सर्वाधिक घसरण Amber Enterprises, Swan Energy, SW Solar, Aegis Logistics यात दिसून आली. तर मिडकॅपमध्ये सर्वाधिक घसरण Policy Bazaar, BSE, BDL, Escorts Kubota आणि Lupin मध्ये पाहायला मिळत आहे.
शेअर बाजारातील मोठ्या घसरणीचे कारण काय?
भारतीय बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण हे अमेरिकेने स्टील व अॅल्यूमिनियमच्या आयातीवर लावलेला 25 टक्के कर आहे. यामुळे जगात नवीन व्यापार युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचाच फटका भारतीय बाजाराला बसला आहे.
परकीय गुंतवणूकदार गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून भारतीय शेअर्समधून मोठ्या प्रमाणात पैसे काढत आहेत. यूएस बॉंड यिल्ड्स आणि मजबूत डॉलर हे यामागचे प्रमुख कारण आहे. याशिवाय, स्मॉल आणि मिडकॅप स्टॉक्समध्ये प्रचंड मोठा फुगवटा तयार झाला आहे. स्टॉक्सच्या मुल्यांमध्ये मोठी वाढ दिसून आली होती. त्यामुळे BSE स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्समध्ये प्रत्येकी 3% पेक्षा जास्त घसरण झाली आहे.