श्रीरामपूर,(प्रतिनिधी)- शहरातील मोगरे वस्ती परिसरातील गणपती मंदिर येथील पप्पु शेटे यांच्या घराजवळ रस्त्यावर खाली पडलेला पेरू खाण्यासाठी उचलल्याने झाडावरुनच पेरू तोडला असा गैरसमज करून घेत एका जणास मारहाण करत चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मारहाणीत 5 जण जखमी झाले असून, पोलिसांनी सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
श्रीरामपूर शहरातील मोगरे वस्ती वार्ड नं.७ येथील गणपती मंदिर टॉवर रोड येथील पप्पू शेटे यांचे घराजवळच्या रोडवर सत्या गुंड याने खाली पडलेला पेरू खाण्यासाठी उचल्याने अरफान शेख याने झाडावरुन पेरू तोडला असा गैरसमज करून घेत त्यास मारहाण केली.
तेव्हा पुतणी जयनी उईके हिने समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्याने काहीएक ऐकून न घेता हरभजन उईके यास जीवे मारण्याच्या उद्देश्याने त्याचेकडील चाकू पाठीवर खुपसला. पुन्हा चाकू मारण्याचा प्रयत्न केला असता त्यास अॅन्थोनी उईके याने मध्यस्थी करत वाचवण्याचा प्रयत्न केला.
सदरचा चाकू अॅन्थोनी यास हातावर लागून दुखापत झाली. तसेच हुजैप शेख याने त्याचेकडील लोखंडी रॉडने जयनी उईके, दिपीका उईके अशांना डोक्यावर, कपाळावर मारून दुखापत केली. फिरोज फिटरवाला त्याचेसोबत इतर ४ ते ५ अनोळखी साथीदारांनी सागर उईके यास मारहाण केली.
त्याचेकडील दगड फेकून मारत आम्हास जातीवाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद आशा अंजेश उईके यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अरफान शेख, हुजैप शेख, फिरोज फिटरवाला व इतर ४ ते ५ अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.