पुणे – डेअरी व्यवसायिकाला तलवारीचा धाक दाखवत तसेच चाकूने वार करत लूटण्यात आले. त्याच्याकडील दहा हजाराची रोकड, लॅपटॉप आणि कागदपत्रे चोरण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी पांडुरंग सदाशिव कुरळे ( 42, रा.वारजे माळवाडी) यांचा डेअरीचा व्यवसाय आहे. ते नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एनआयबीएम रोडकडून पुण्यधाम चौकाकडे दुचाकीवरुन जात होते. रस्त्याच्याकडेला लघुशंकेसाठी थांबल्यावर ते भागीदाराशी मोबाईलवरुन बोलत होते.
यावेळी अचानक तीन व्यक्ती तेथे आल्या. एकाने त्यांची कॉलर पकडली तर दुसऱ्याने तलवार काढून धमकावले. तीसऱ्या व्यक्तीने त्यांच्या पाठीवरील सॅक काढून घेण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी पांडुरंग यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांना खाली ढकलून देण्यात आल्याने, त्यांच्या कपाळावर मार लागला. इतक्यात त्यांच्या चेहऱ्यावर चाकूने हल्ला केला गेला. यानंतर आरोपींनी त्यांच्या सॅकमधील लॅपटॉप, रोकड, आधार व एटीएम कार्ड असा 35 हजाराचा ऐवज चोरुन पळ काढला.