लक्षात घ्या : “उचलेगिरी’ हा एक मानसिक आजारच…

क्लेप्टोमेनियाचा आजार असणा-या व्यक्तींची मानसिक स्थिती स्थिर नसतेच

एका मोठ्या मॉलच्या सीसीटीव्ही कॅमे-यात एका तरुणीच्या संशयास्पद हालचाली बंदिस्त झाल्या. त्या तरुणीला मॉलच्या अधिका-यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तिच्यासोबत असलेल्या बॅगची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्या बॅगमध्ये डिओ स्प्रेची बाटली, दोन बिस्किटांचे पुडे सापडले. त्या वस्तूंचं बिल तयार करण्यात आलेलं नव्हतं. कपड्यांवरून ती तरुणी चांगल्या घराण्यातील वाटत होती. आपण चोरी केलीच नाही, असं ती वारंवार चौकशी करणा-या अधिका-यांना सांगत होती. शेवटी तिने फोन करून स्वत:च्या नव-याला बोलावून घेतलं. तिचा नवरा व्यावसायिक होता. त्याच्याकडून अधिका-यांना बायकोला असणा-या क्लेप्टोमेनिया या मानसिक आजाराविषयी समजलं.

क्लेप्टोमेनिया या मानसिक आजारात रुग्णांना लहान-सहान वस्तूंची चोरी करावीशी वाटते. प्रत्यक्षात चोरी करण्याचा त्यांचा उद्देश नसतो. आपल्याला असणा-या मानसिक आजारामुळे आपण वस्तूंची चोरी करतोय, याचीही जाणीव रुग्णांना नसते. काही श्रीमंत व्यक्तींना या आजारामुळे किरकोळ वस्तू चोरण्याची सवय असल्याची उदाहरणंही आपण पाहत असतो. क्लेप्टोमेनियाग्रस्त रुग्णांना या आजारातून बाहेर काढण्याचं काम मानसोपचारतज्ज्ञच करतात.

आजाराची लक्षणं?
गरजेच्या नसलेल्या आणि किरकोळ किंमत असलेल्या वस्तूंची चोरी करणं.
चोरी करताना मानसिक संतुलन ढासळणं.
चोरी केल्यानंतर चक्कर येणं.

या आजाराने ग्रस्त असणारी व्यक्ती चोरी करण्यासाठी विविध प्लॅन्सची आखणी करत नाही. सार्वजनिक ठिकाणी जाताच तिच्या मनात चोरी करण्याची इच्छा निर्माण होते. बहुतेक वेळी क्लेप्टोमेनियाच्या रुग्णाकडून मॉल्स, सुपरमार्केटमध्ये चोरी केली जाते. मित्र किंवा कुटुंबीयांच्या सामानाची चोरीही या रुग्णांकडून केली जाते. चोरी केलेल्या वस्तू टाकून दिल्या जातात. कधी कधी तर चोरी केलेल्या वस्तू नकळत त्या जागेवरही ठेवल्या जातात.

कारणं
या रोगाच्या कारणांची अजून तरी नीटशी माहिती समजलेली नाही. मेंदूत सिरोटोनल नावाचं रसायन स्त्रवतं. हे रसायन स्र्वण्याचं प्रमाण घटल्यामुळे क्लेप्टोमेनिया या मनोविकाराचा त्रास होतो. एखाद्या अपघातात डोक्याला लागलेल्या जबरदस्त मारामुळे सिरोटोनल नावाचं रसायन कमी स्त्रवतो. अशा अपघातांमुळे क्लेप्टोमेनिया होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. क्लेप्टोमेनिया या आजाराच्या इतर कारणांवर तसंच हा आजार असणा-या रुग्णांच्या इतर शारीरिक गुणदोषांवर संशोधन चालू आहे. तसंच क्लेप्टोमेनिया हा आजार असणा-या व्यक्तीला इतर कुठले मानसिक आजार असतात, यावरही संशोधन चालू आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये क्लेप्टोमेनिया या मानसिक आजाराचे रुग्ण जास्त आढळून येतात. त्यापैकी ब-याच स्त्रिया चांगल्या घरातील आहेत.

औषधोपचार
क्लेप्टोमेनिया हा मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तीने योग्य वेळी औषधोपचार करणं गरजेचं आहे. क्लेप्टोमेनिया या मानसिक आजाराचं संशोधन केलं जात आहे. संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्लेप्टोमेनियाचा आजार असणा-या व्यक्तींची मानसिक स्थिती स्थिर नसतेच. क्लेप्टोमेनियाच्या व्यक्ती ताणतणाव, नैराश्य, चिडचिडेपणा या आजारांनी त्रस्त असतात. आजारी व्यक्तींचं समुपदेशन झालं नाही, तर क्लेप्टोमेनिया या आजाराची स्थिती गंभीर होते. आपल्याकडे हा त्रास असणा-या व्यक्तीबरोबर योग्य पद्धतीने वागलं जात नाही. व्यक्तीवर चोरीचा ठपका ठेवून अपमानास्पद वागणूक दिली जाते. असं झाल्यास रुग्णाला अधिकच नैराश्य येतं. अशा वेळी रुग्णाला औषधोपचार आणि समुपदेशनाची गरज असते.

आजाराकडे दुर्लक्ष नको
हा मानसिक आजार श्रीमंत लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. १५ ते २५ हा या आजाराचा वयोगट आहे. चोरी करण्याची इच्छा निर्माण झाल्यावर त्या व्यक्तींना चोरी करावीच लागते. न केल्यास चिडचिडेपणा येतो. त्या व्यक्ती अस्वस्थही होतात. मेंदूमध्ये सिरोटोनल नावाचं रसायन स्र्वतं. या रसायनाचं प्रमाण गरजेपेक्षा कमी झाल्यावर क्लेप्टोमेनिया हा मानसिक आजार जडतो. औषधं, व्यायाम, समुपदेशन यांच्या मदतीने रुग्णाला क्लेप्टोमेनिया या मानसिक आजारातून बरं करता येतं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.