आबुधाबी – कर्णधार लोकेश राहुल, मयंक आग्रवाल व निकोलस पूरन यांच्या आक्रमक फलंदाजीनंतरही किंग्ज इलेव्हन पंजाबला हातात असलेला सामना गमवावा लागला. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा अवघ्या दोन धावांनी पराभव केला. एकवेळ पंजाबचा विजय ही केवळ औपचारिकता आहे, असे वाटत असतानाच त्यांनी आत्मघातकी फलंदाजी केली व अखेरच्या षटकात सुनील नरेनने केलेल्या अफलातून गोलंदाजीमुळे कोलकाताने अशक्यप्राय विजय मिळवला.
पंजाबच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे कोलकाताला 164 धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना राहुलने मयंकच्या साथीत संघाला शतकी सलामी दिली. या जोडीने सलामीला येत 900 धावांपेक्षाही जास्त धावांची सलामी देण्याची कामगिरी या स्पर्धेच्या इतिहासात केली. या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली.
मयंक मात्र, लगेचच बाद झाला. त्याला प्रसिध कृष्णाने बाद केले. त्याने 39 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावताना 56 धावांची खेळी केली. त्यावेळी यंदाच्या स्पर्धेत प्रचंड भरात असलेल्या निकोलस पूरनने राहुलला सुरेख साथ देताना आक्रमक फलंदाजी केली. मात्र, त्याचा सुनील नरेनच्या चेंडूवर अक्रॉस द लाइन खेळण्याच्या प्रयत्नात त्रिफळा उडाला. त्याने 10 चेंडूत 2 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 16 धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या सिमरन सिंगनेही निराशा केली. त्यानंतर कर्णधार राहुलही प्रसिधचा बाहेरचा चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात त्रिफळाबाद झाला व तिथेच सामना कोलकाताच्या बाजूने फिरला. त्याने 58 चेंडूत 6 चौकारांसह 74 धावांची केलेली खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. त्याचवेळी निर्माण झालेली विजयाची संधी कोलकताने दवडली नाही.
अखेरच्या दोन षटकांत पंजाबला 20 धावांची गरज होती. त्यावेळी पंजाबला एका षटकात 13 धावांची गरज होती. ग्लेन मॅक्सवेल व मनदीप सिंग खेळपट्टीवर होते. सुनील नरेनच्या पहिल्या चेंडूवर मॅक्सवेलने दोन धावा काढल्या. दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार फटकावला. चौथ्या चेंडूवर लेगबायची एक धाव मिळाली. पाचव्या चेंडूवर उंचावरून फटका मारताना मनदीप बाद झाला. आता अखेरच्या चेंडूवर 7 धावा हव्या असताना मॅक्सवेलने मारलेला फटका षटकार नव्हे तर काही मिलिमीटरच्या अंतराने सीमारेषेच्या आत पडला व चौकार ठरला. त्यामुळे सामना सुपर एव्हरमध्ये न जाता कोलकाताचा अवघ्या 2 धावांनी विजय झाला. भक्कम स्थितीतून पंजाबने आत्मघातकी फलंदाजीने हातात असलेला सामना गमावला.
तत्पूर्वी, किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या या लढतीत नाणेफेक जिंकत कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीर शुभमन गीलने पहिल्या षटकापासूनच आक्रमक फलंदाजी केली. मात्र, त्याला समोरून योग्य साथ मिळाली नाही. राहुल त्रिपाठी केवळ 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर नितीश राणाही चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. मग गीलने इयान मॉर्गनच्या साथीत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. स्थिरावलेला असतानाही मॉर्गन बाद झाला. त्याने 23 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारांसह 24 धावा केल्या.कोलकाताचा कर्णधार दीनेश कार्तिकने आक्रमक फलंदाजी केली.
गीलने कार्तिकच्या साथीत चौथ्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी केली व संघाचा डाव सावरला. गीलने आपले अर्धशतकही पूर्ण केले. त्याने 47 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. गील बाद झाल्यावर मात्र, कार्तिकने धावांचा वेग वाढवला. त्यानेही यंदाच्या स्पर्धेतील पहिलेच अर्धशतक साकार करताना 29 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी करत 58 धावांची खेळी केली. तो 20 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेताना धावबाद झाला. या दोघांच्या खेळीच्या जोरावर कोलकाताने 20 षटकांत 6 बाद 164 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक –
कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 6 बाद 164 धावा. (दिनेश कार्तिक 58, शुभमन गील 57, महंमद शमी 1-30, हर्षदीप सिंग 1-25, रवी बिष्णोई 1-25). किंग्ज इलेव्हन पंजाब – 20 षटकांत 5 बाद 162 धावा. (मयंक आग्रवाल 56, लोकेश राहुल 74, निकोलस पूरन 16, ग्लेन मॅक्सवेल 10, प्रसिध कृष्णा 3-29, सुनील नरेन 2-28).