नवी दिल्ली – केकेएफआय 2021 सुपर लीग खो खो चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरचा रोहन शिंगाडेने अष्टपैलू कामगिरी करत पहाडी बिल्लाजला फ्रिस्की रेंजर्स विरुद्ध ब गटातील सामन्यात तीन गुणांनी विजय मिळवून दिला. तर पॅंथर्सच्या काजल भोरने मुलींच्या गटात चमक दाखवली. ही स्पर्धा नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे सुरू आहे.
केकेएफआय आणि अल्टिमेट खो खो (यूकेके) यांनी प्रथमच वैज्ञानिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. ही स्पर्धा खेळाडू मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग आहे. पहाडी बिल्लाजला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्याने दुसऱ्या दिवशी 32-29 असा विजय मिळवला.
शिंगाडेने तीन मिनिटे आणि 20 सेकंद वेळ बचाव केला. त्यानंतर आक्रमणात त्याने सात गुणांची कमाई केली. त्याला महाराष्ट्रच्या प्रतीक वाईकर, महेश शिंदे आणि सागर पोतदार या तिन्ही खेळाडूंनी चांगली साथ दिली. कर्णधार वाईकर आणि शिंदे यांनी पाच गुणांची कमाई केली. तर पोतदारने तीन गुणांची कमाई केली. फ्रिस्की रेंजर्स संघासाठी मध्य प्रदेश देवेंद्र डागुर यांनी सहा गुणांची कमाई केली.
अ गटातील सामन्यात कर्नाटकच्या सुदर्शन आणि पंजाबच्या हरकिरत सिंग यांनी रायनोज संघाविरुद्ध जगुअर्स संघाला एक गुणांनी विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका पार पाडली. हरकिरतने बचावात दोन मिनिटे 55 सेकंद वेळ घालवला, तर सुदर्शनने सात गुणांची कमाई केली.
दरम्यान, महिलांच्या सामन्यात पॅंथर्स संघाने आपला विजयी सातत्य कायम ठेवले. त्यांनी चिताज संघाविरुद्ध आपला सलग दुसरा विजय मिळवला. एक गुणाने मिळवलेल्या विजयात पॅंथर्सकडून काजलने चमक दाखवली. तिने एक मिनिट आणि 10 सेकंद वेळ घालवला आणि आक्रमण करताना संघाच्या आठ गुणातील सात गुण एकटीने कमाविले.
पुरुषांच्या आठ संघांची विभागणी अ आणि ब गटात करण्यात आली. ते उद्यादेखील आपल्या गटातील राऊंड रॉबिन लढती खेळतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. स्पर्धेतील अंतिम सामना 15 फेब्रुवारीला होईल. विजेत्या संघाला 2 लाख, उपविजेत्या संघास 1.5 लाख आणि तिसऱ्या व चौथ्या स्थानी असलेल्या संघांना प्रत्येकी 50 हजार रुपये मिळणार आहेत. महिला संघांना प्रत्येकी 30 हजार रुपये मिळतील.