वेलिंग्टन – फलंदाजी करताना क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल (ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड) न्यूझीलंडचा प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील खेळाडू टॉम ब्लंडल याला बाद ठरवण्यात आले. क्रिकेटच्या नियमातील या पद्धतीने बाद होणारा ब्लंडल न्यूझीलंडचा दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे.
प्लंकेट शिल्ड स्पर्धेतील ओटांगो विरुद्धच्या सामन्यात वेलिंग्टन प्रोव्हिन्सकडून खेळताना त्याने शतक फटकावले. ओटांगोचा गोलंदाज जेकब डफी याचा चेंडू फटकावल्यावर जेकबने ब्लंडलला धावबाद करण्यासाठी चेंडू यष्टींवर फेकला. हा चेंडू ब्लंडलने पायाने अडवण्याचा प्रयत्नही केला मात्र, त्यानंतर त्याने हाताने चेंडू अडवताना गोलंदाजाकडे परत फेकला.
त्याची ही कृती नियमांत बसत नसल्याने गोलंदाजाने केलेले अपिल ग्राह्य धरत पंचांनी ब्लंडलला बाद ठरवले. सहा दशकांपूर्वी जॉन हेन्स या फलंदाजालाही याच नियमाने बाद देण्यात आले होते.