मुंबई : सध्या अभिनेत्री केतकी चितळेनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात केतकीला अटक झाली आहे. आता यावर शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केतकीच्या कृत्याचा निषेध व्यक्त करत तिच्या आजाराबाबतही टीका केली आहे, त्याच बरोबर यामागे कर्ता करविता कोणी वेगळाच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केतकी चितळे पोस्ट प्रकरणी किशोरी पेडणेकर बोलताना तिला विकृती असा उल्लेख देखील त्यांनी केला. तसेच केतकी चितळेचे समर्थन करणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्यावरही पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे. “केतकी चितळेबाबत बोलायचं झालं तर तिच्या आजारपणाचं सगळ्यांना माहिती आहे. तिच्या या कृत्यामागे कर्ता करविता वेगळा आहे. शरद पवारांबद्दल जी टीका केली. ज्याचे समर्थन सदाभाऊ खोत तुम्ही करताय? तुमचं वय काय आहे ? त्यात त्यापेक्षा राजकारणात किती वय आहे हे बघावं. या विकृत प्रवृत्तीचं समर्थन करू नये” असा सल्ला पेडणेकरांनी दिला आहे.
दरम्यान,देवेंद्र फडणवीस यांच्या सभेबाबत किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे, मुंबईची काळजी तुम्ही करु नका, मुंबई पेक्षा पुणे नागपूर बघा तिथे भ्रष्टाचार नाही का? बीएमसीत भाजपचा भगवा झेंडा कधीच फडकवला जाणार नाही. त्यांची वानरसेना आहे, पण राम आमचा आहे, उद्धवजी यांनी लाफटर शो कधीच केला नाही, तुमचं वजन तुम्ही कबूल केलं, मेट्रो मॅन जर देवेंद्र फडणवीस असतील तर त्यामध्ये पापांचे सुद्धा धनी व्हा. आपण जबाबदारीने वागा !