मुंबई : राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटात थेट राजकीय धूळ उडत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवसेना मराठी माणसाला संपवत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केल्याचे माध्यम प्रतिनिधींनी विचारताच किशोरी पेडणेकरांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा समाचार घेतला आहे.
शिंदे गटाच्या टीकेवर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देत, “उद्धव ठाकरेंवर ते सातत्याने टीका करत आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना चारही बाजूंनी घेरलंय. तरीदेखील उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कमी होत नाहीय. ही खरी यांची पोटदुखी आहे.” अशी टीका त्यांनी केली असल्याचे दिसून येत आहे
दरम्यान, यावेळी बोलताना किशोरी पेडणेकरांनी एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याला देखील प्रत्युत्तर दिले आहे. “माझ्यासारखी सामान्य स्त्री महापौर होऊ शकते. सामान्य रिक्षाचालक म्हणून तु्म्ही यूडीचे अधिकारी झालात. आज त्याच आधारावर तुम्ही मुख्यमंत्रीही झालात. त्यामुळे शिवसेनेनं मराठी माणसाला उलट आधार दिला. तुमच्या-आमच्या कष्टांना वाव दिला. उद्धव ठाकरेंनी जास्त वरदहस्त तुमच्यावर ठेवला”, असे पेडणेकर म्हणाल्या.
यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी भाजपाच्या अमराठी लोकप्रतिनिधींची आकडेवारीच सादर केली. “मुंबईत भाजपाचे तीन खासदार आहेत. त्यात दोन अमराठी आहेत. १७ आमदार आहेत. त्यात ७ आमदार अमराठी आहेत. महापालिकेत भाजपाचे ८२ नगरसेवक आहेत. त्यात जवळपास ७० नगरसेवक अमराठी, परप्रांतीय आहेत”, असे त्या म्हणाल्या.