तळेगांव दाभाडे – जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर गंगाराम आवारे यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करीत खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यालयासमोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे कामानिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये आले होते.
यावेळी नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार देखील केले. जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
यावेळी रुग्णालय बाहेर मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक जमले होते. समर्थकांना भावना अनावर झाल्याने हॉस्पिटलमध्ये मोठा आक्रोश झाला होता. निधनाची वार्ता तळेगावमध्ये वाऱ्यासारखी पसरली असता दुकानदारांनी दुकाने बंद केली.
भर दिवसा तळेगाव दाभाडे नगर परिषद परिसरामध्ये आवरे यांचा खून झाल्याने तळेगाव दाभाडे शहरात खळबळ उडाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे.