बारामती – करोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात सामाजिक योगदान दिल्याबद्दल अजितदादा पवार युथ फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ व सिल्वर जुबली शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सदानंद काळे यांना आमदार निलेश लंके यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अजित दादा पवार युथ फाउंडेशन च्या वतीने करोना योद्धा पुरस्कार तसेच रक्तदान शिबिरचे आयोजन केले होते. व यावेळी आमदार निलेश लंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. करोना सारख्या जागतिक महामारीत बारामतीत रुग्णांना वैद्यकीय सेवेबरोबरच मानसिक आधार तसेच त्यांच्या कुटुंबियांना जीवनावश्यक बाबींचा आधार मासाळ यांनी दिला. नटराज नाट्य कला संचलित कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून गेली दीड वर्ष मासाळ कार्यरत आहेत. याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.
नगराध्यक्षापौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, युवक अध्यक्ष राहुल वाबळे,महिला अध्यक्ष वनिता बनकर, युवती अध्यक्ष भाग्यश्री धायगुडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत गावडे, बारामती सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष प्रताप पागळे, भारत मोकाशी, आयोजक सोमनाथ गायकवाड उपाध्यक्ष दत्ता माने यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
करोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात नटराज नाट्य कला मंडळ संचलित सेंटरच्या माध्यमातून गेली दीड वर्ष मी कार्यरत आहे. या सामाजिक बांधिलकीची दखल घेत अजितदादा युथ फौंडेशनच्या वतीने मला करोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले. ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली असल्याचे किशोर मासाळ यांनी प्रभात शी बोलताना सांगितले.