लॉकडाऊन काळात असाही फायदा

भाजी विक्रीतून किसान संघाची दोन कोटींची उलाढाल

पुणे – भारतीय किसान संघाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात फळे व भाजीपाल्याची थेट विक्री करून सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. सोशल मीडियाचा वापर करून व संघाच्या शहरातील कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजीपाला व फळांची विक्री संघाने सुरू ठेवली आहे. ग्राहक पंचायत व संघाच्या ग्रामविकास विभाग यांच्या सहकार्याने इर्जिक या नावाने हा उपक्रम सुरू आहे.

राज्यातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, सोलापूर, नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सुमारे 29 तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी संघामार्फत थेट भाजीपाला विकला आहे. या जिल्ह्यातील 164 शेतकरी गटांमार्फत भाजीपाला संकलीत करून तो शहरी भागात विकण्यात आला. या उपक्रमाचा या जिल्ह्यातील सुमारे पाचशे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

दीड लाखाहून अधिक ग्राहक व्यापाऱ्यांपेक्षा कमी दरात या शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेत आहेत. जनता कर्फ्यू जाहीर झाल्यानंतर लगेच भारतीय किसान संघाने प्रांत कार्यकारिणीची बैठक घेतली. आठ जिल्ह्यातील 29 तालुक्‍यांत 164 गावात शेतकऱ्यांचे गट स्थापन करून हे काम ताबडतोब सुरू केले. सुमारे पाचशे शेतकरी या गटांच्या माध्यमातून शहरी भागातील ग्राहकांना फळे व भाजीपाला पुरवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.