Martyr Pravin Janjal: महाराष्ट्राच्या वीरसुपुत्राला मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’; अश्रू अनावर झालेल्या वीरमातेला राष्ट्रपतींनी प्रोटोकॉल मोडून मारली मिठी
Martyr Pravin Janjal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम याठिकाणी दहशतवाद्यांविरुद्ध लढताना शौर्याने प्राणांची आहुती देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले.

Martyr Pravin Janjal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम याठिकाणी दहशतवाद्यांविरुद्ध लढताना शौर्याने प्राणांची आहुती देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. मात्र या वेळी घडलेल्या प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावले.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रवीण यांच्या पत्नी शंभाला जंजाळ आणि आई शालू जंजाळ उपस्थित होत्या. मुलाच्या शौर्याचा अभिमान आणि त्याच्या निधनाचे दुःख या भावनांनी व्याकूळ झालेल्या शालू जंजाळ यांना अश्रू अनावर झाले. (Martyr Pravin Janjal)
हा हृदयस्पर्शी क्षण पाहून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत वीरमातेला मिठी मारली आणि त्यांचे सांत्वन केले. हा प्रसंग पाहून सभागृहातील उपस्थितांचे डोळेही पाणावले. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवर या क्षणी भावूक झाले.

Martyr Pravin Janjal: महाराष्ट्राच्या वीरसुपुत्राला मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’; अश्रू अनावर झालेल्या वीरमातेला राष्ट्रपतींनी प्रोटोकॉल मोडून मारली मिठी
कुलगाममधील धाडसी कारवाई (Martyr Pravin Janjal)
६ जुलै २०२४ रोजी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील फ्रिसल चिन्नीगाम परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर भारतीय सैन्याच्या राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम हाती घेत परिसराला वेढा घातला.
मोहीम सुरू असताना एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर जोरदार गोळीबार केला. दाट लोकवस्ती आणि कठीण परिस्थिती असूनही प्रवीण जंजाळ यांनी अपूर्व धैर्य दाखवत मोर्चा सांभाळला. त्यांनी अचूक निशाणा साधत दोन दहशतवाद्यांचा खातमा केला आणि वेढा अधिक मजबूत केला.
President Smt Droupadi Murmu presented Kirti Chakra (Posthumous) to Sepoy Janjal Pravin Prabhakar during Defence Investiture Ceremony 2026 (Phase-1) in New Delhi on June 08, 2026. The award was received by his wife Smt Shambala Pravin Janjal, and mother Smt Shalu Prabhakar… pic.twitter.com/z57XvK31hS
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) June 8, 2026
या चकमकीदरम्यान दहशतवाद्यांच्या अनेक गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या. डोक्यालाही गोळी लागून ते गंभीर जखमी झाले, तरीही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरू ठेवला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या कारवाईत एकूण सहा दहशतवादी ठार झाले होते, तर सैन्याचे दोन जवान शहीद झाले होते.
शहीद होण्याच्या दोन तास आधी घरच्यांशी संवाद
शहीद होण्याच्या अवघ्या दोन तासांपूर्वी प्रवीण यांनी आपल्या कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला होता. अकोला जिल्ह्यातील त्यांच्या गावात नवीन घराचे बांधकाम सुरू होते. त्यासाठी पाठवलेले ४९ हजार रुपये मिळाले का, याची त्यांनी मोठ्या भावाकडे चौकशी केली होती.
घराच्या कामाबाबत चर्चा झाल्यानंतर काही वेळातच त्यांच्या युनिटकडून फोन आला आणि प्रवीण शहीद झाल्याची दुर्दैवी बातमी कुटुंबीयांना समजली. त्यांनी पाठवलेल्या पैशांतून स्वप्नातील घर पूर्ण झाले, मात्र ते घर स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची त्यांची इच्छा कायमची अपूर्ण राहिली.
शेतकरी कुटुंबातील मुलाने गाठले शौर्याचे शिखर (Martyr Pravin Janjal)
प्रवीण जंजाळ यांचे वडील प्रभाकर जंजाळ हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या कुटुंबाकडे अवघी दीड एकर शेती आहे. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत प्रवीण यांनी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या नोकरीमुळे कुटुंबाच्या आयुष्यात स्थैर्य येऊ लागले होते.
अवघ्या वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह शंभाला यांच्याशी झाला होता. मात्र लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा होण्यापूर्वीच त्या वीरपत्नी बनल्या. प्रवीण आणि त्यांच्या भावाने एकत्रितपणे सैन्य भरतीची तयारी केली होती. प्रवीण पहिल्याच प्रयत्नात महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले, तर त्यांचे भाऊ सध्या राज्य पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
काश्मीरमध्ये नियुक्ती होण्यापूर्वी प्रवीण यांनी अरुणाचल प्रदेशसारख्या दुर्गम भागातही देशसेवा बजावली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती राष्ट्रीय रायफल्समध्ये करण्यात आली. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीरसैनिकाच्या शौर्याची दखल घेत त्यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ बहाल करण्यात आले.





