बुलडाणा – बिग बाॅस मराठी शोमध्ये सहभाग घेतलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा नवरात्र उत्सव मंडळाळे शिवलीला यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. यावेळी जास्त गर्दी झाली. कोविड नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी जिजाऊ दुर्गा मंडळाचे आजोजक संदीप राऊत, गणेश मोरे, किशोर पोफळगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. कीर्तनासाठी मोठ्या संख्येने भाविक जमा झाले. कोविड नियमावली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, शिवलीला पाटील यांनी बिग बाॅस शोमध्ये सहभागी झाल्याने वारकरी संप्रदायात संतापाची लाट परसली होती. अनेक कीर्तनकार मंडळींकडून त्यांच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांनी यापुढे वारकरी संप्रदायीक कीर्तन करू नये असे सांगण्यात येत होते. शिवलीला पाटील काही दिवसांपूर्वीच आजारी असल्याच्या कारणाने बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्या आहेत. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर त्यांच्या बिग बाॅसच्या घरात जाण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सर्वांची माफी मागते, असे म्हंटले आहे.