मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर काल (दि.11) ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर यावेळी छापे टाकण्यात आले होते. तब्बल 12 तास मुश्रीफांच्या घरी छापेमारी सुरू होती. सकाळी सात वाजता सुरू झालेला तपास सायंकाळी सात वाजता संपला. यानंतर राज्यभरातून विरोधी पक्ष नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली होती. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली.
यावेळी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांचं काऊंटडाऊन सुरु झाल्याचं सांगितलं होत. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. “सोमय्यांचा नेम चुकला आहे… तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे”. असा इशाराच अमोल मिटकरी यांनी यावेळी दिला. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील त्यांचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं अमोल मिटकरी काय म्हणाले….
किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना अमोल मिटकरी म्हणाले, “किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्यावर तोंडसुख घेत आहेत. मात्र, यावेळी सोमय्यांचा नेम चुकला आहे. तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे. तुमची तोतली जबान आहे, त्याला झणझणीत चपराक करवीरवासी देतील.
शाहू भूमिच्या लाल मातीत तुमच्या पक्षासहित तुम्हाला नेस्तानाबूत केल्याशिवाय जनता राहणार नाही. 2024 ला किरीट सोमय्यांच्या पक्षांसह हिशोब चुकता करणार आहे. तुम्ही कितीही त्रास द्या, जनता शहाणी आहे, याचा बदला नक्की घेणार…”. असं अमोल मिटकरी यावेळी म्हणाले.
दरम्यान, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. यावेळी घराला आणि परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त होता.