राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांचे थेट आव्हान
पिंपरी – महाविकास आघाडी आणि मुंबई महापालिकेवर आरोप करण्यापेक्षा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करावा. पुरावेदेखील आम्ही देऊ त्यांनी फक्त महापालिकेच्या कारभारात लक्ष घालण्याचे धाडस दाखवावे आणि भाजपाच्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवावा, असे थेट आव्हान शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिले आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ प्रकाशित करत मुंबई महापालिकेच्या वतीने उभारलेल्या निवारा केंद्रातील जेवणावरून टीका केली होती. तसेच करोना अटोक्यात आणण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. त्याच्या उत्तरादाखल वाघेरे यांनी प्रसिद्धपत्रक काढले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात वाघेरे यांनी म्हटले आहे की, किरीट सोमय्या यांनी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या निवारा केंद्रातील परिस्थिती पहावी. या ठिकाणी असलेल्या नागरिकांना साधा चहा, नाष्टादेखील मिळत नसून अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. यासाठी महापालिका प्रतिदिन प्रतिव्यक्ती 170 रुपयांपासून 480 रुपये ठेकेदारांना देत आहे. जेवण पुरविणारे सर्व ठेकेदार हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. आम्ही पुरावे देण्यास तयार आहोत. त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करावा.
मास्क, औषधे, वैद्यकीय साहित्य यासह तातडीची म्हणून केलेल्या खरेदीमध्ये सत्ताधारी पदाधिकारी आणि त्यांच्या ठेकेदारांनी कोट्यवधींची माया गोळा केली आहे. त्याकडेही त्यांनी लक्ष देऊन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची पाच वर्षांपूर्वीची संपत्ती आणि आताची संपत्ती जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी दिले. महापालिका जेवणासाठी साहित्य आणि पैसे देत असतानाही भाजपाचे नेतेमंडळी आणि नगरसेवकांनी आपणच जेवण पुरवित असल्याची प्रसिद्धी केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.