मोठी बातमी! अखेर वाढत्या गर्दीमुळे किराणा दुकानांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई  – किराणा सामान खरेदीच्या नावावर रिकामे फिरणाऱ्यांना चाप लावण्यासाठी किराणा दुकाने सकाळी सात ते 11 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

कोरोनाबाधितांमुळे ऑक्‍सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी तात्काळ सुरु करण्याचे निर्णयही या बैठकीत घेण्यात आले.

ऑक्‍सिजनची टंचाई दूर करण्यासाठी पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्‍सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा. अनेक उद्योगांमध्ये ऑक्‍सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत. त्यांचा शोध घेऊन ती संयंत्रे तातडीने दुरुस्त करावीत.

कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकसचिवांनी जिल्हा प्रशासन व मंत्रालयातील दूवा म्हणून जबाबदारी घ्यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत, राज्यातील रुग्णालयात उपलब्ध बेड्‌सचा, ऑक्‍सिजन तसेच रेमडेसिविर औषध पुरवठ्याचा आढावा घेतला.

इतर राज्यात रुग्णवाढ झाल्यानंतर महाराष्ट्राला बाहेरुन मिळणारा ऑक्‍सिजन कमी पडण्याची भीती लक्षात घेऊन राज्यातच अधिकाधिक ऑक्‍सिजन निर्मिती करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करावी. कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांच्या ठिकाणी हवेतून ऑक्‍सिजन निर्माण करण्याचे प्रकल्प स्थापन झाले आहेत.

मुंबई महापालिकेनेही अशा प्रकल्पनिर्मिती संदर्भात कार्यवाही सुरु केली आहे. या तिघांनी विहित प्रक्रियेद्वारे खरेदी केलेल्या दरांना प्रमाण मानून नवीन ऑक्‍सिजन प्रकल्पांसाठी खर्च करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यामुळे निविदा प्रक्रियेतील विलंब टाळता येईल व प्रकल्प लवकर कार्यान्वित होईल, असे ते म्हणाले.

राज्यात रेमडेसिविर इंजेक्‍शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. देशातील प्रमुख सात रेमिडिसिव्हीर निर्मात्या कंपन्यांशी खरेदीसाठी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारलाही यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. रेमडेसिवीर निर्मात्या कंपन्यांच्या क्षमतावाढीसाठी सहकार्य करण्यात येत आहे. लवकरच राज्याला पुरेसा रेमडेसिवीर साठा उपलब्ध होईल, असा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.