प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीसाठी सभासद परिवर्तन पॅनेलने प्रचाराचा धुरळा उडवला. जिल्हातील प्रत्येक शाळेत जावून सभासदांशी संवाद साधत त्यांना पॅनेलचा जाहीरनामा पटवून दिला. इतर मागासवर्गातील उमेदवार किरण यादव यांनी सभासद परिवर्तन पॅनेलच्या प्रचाराचा जिल्हाभर धुरळा उडवून दिला.
गेली सात वर्ष बॅंकेच्या भ्रष्ट कारभारावर कटाक्ष ठेवण्याचे व सभासद हितासाठी केलेले काम सभासदांनी पाहिले असल्याने बॅंकेचे सभासद यादव यांना उच्चांकी मतदान देवून बॅंकेत पुन्हा काम करण्याची संधी देतील असा विश्वास शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे यांनी व्यक्त केला.
बॅंकेचा अनागोंदी कारभार, बॅंकेत झालेले गैरव्यवहार आदींवर यादव यांनी आवाज उठवला. सभासदांच्या हिताला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिल्याने विरोधी पॅनेलच्या सभासदांमधूनही किरण यादव यांना मतदान होणार आहे. जिल्हा शिक्षक समितीचे सरचिटणीस म्हणून गेली अनेक वर्ष शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी झगडत असल्याने प्रत्येक भागातून त्यांना उच्चांकी मतदान होणार आहे.
सभासद परिवर्तन करणार हे स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्यासाठी कटीबद्ध राहील, असेही श्री. रणनवरे म्हणाले. माजी सरचिटणीस प्रदीप कदम यांनी बॅंकेतील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले. किरण यादव यांनी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन बॅंकेतील भ्रष्ट कारभाराचे पुरावे सभासदांना दाखवले आहेत. सत्ताधाऱ्यांबद्दल सभासदांमध्ये प्रचंड चीड असल्याने त्यांचे रूपांतर निश्चितपणे परिवर्तन पॅनेलच्या मतात होणार असल्याचे कदम म्हणाले.