दुबई : कर्णधार केएल राहुलच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर आणि फिरकीपटू मुरूगन अश्विन व रवि बिश्नोई यांच्या प्रभावी गोंलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्ज इलेव्हन संघाने राॅयल चॅलेजंर्स बेंगळुरूवर 97 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह पंजाबने स्पर्धेतील विजयाचं आपलं खातं देखील उघडल. केएल राहुल सामन्याचा मानकरी ठरला. त्याने 69 चेंडूत नाबाद 132 धावा केल्या.
विराट कोहली याने टाॅस जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. त्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 बाद 206 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. पंजाबकडून के. एल राहुलने तुफानी खेळी करताना 69 चेंडूत 14 चौकार आणि 7 षटकरांसह नाबाद 132 धावा पटकावल्या. राहुल व्यक्तिरित मयंक अग्रवालने 26(20), निकोलस पूरनने 17(18), ग्लेन मॅक्सवेलने 5(6) आणि करून नायरने नाबाद 15(8) धावांची खेळी केली.
बेंगळुरू संघाकडून गोलंदाजीत शिवम दुबेने 3 षटकांत 33 धावा देत सर्वाधिक 2 विकेट घेतल्या तर युजवेंद्र चहलने 4 षटकांत 25 धावा देत 1 विकेट घेतली. अनुभवी गोलंदाज डेल स्टेनची गोलंदाजी महागडी ठरली. त्याने 4 षटकांत 57 धावा दिल्या. नवदीप सैनीने 4 षटकात 37 आणि उमेश यादवने 3 षटकात 35 धावा दिल्या. वाॅशिंगटन सुंदरने 2 षटके टाकत 13 धावा दिल्या.
प्रत्युत्तरात विजयासाठी 207 धावांचा पाठलाग करताना बेंगळुरूचा संघ 17 षटकांत सर्वबाद 109 धावसंख्येवरच आटोपला. बेंगळुरूचा एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. देवदत्त पडिक्कल (1), जोश फिलिप (0), विराट कोहली (1), अॅरोन फिंच (20), एबी डी व्हिलीयर्स (28) हे फलंदाज लवकर बाद झाले. वाॅश्गिटंन सुंदर ने 30(27) तर शिवम दुबे याने 12(12) धावा करत संघर्ष केला. पण, इतर फलंदाज अपयशी ठरल्याने बेंगळुरूचा पराभव झाला.
पंजाबकडून गोलंदाजीत मुरूगन अश्विनने 3 षटकांत 21 धावा देत 3 विकेट घेत महत्वाची कामगिरी बजावली. त्याला रवि बिश्नोईने उत्तम साथ दिली.बिश्नोईने 4 षटकांत 32 धावा देत 3 विकेट घेतल्या. शेल्डन काॅटरेलने 17 धावा देत 2 तर मोहमद शम्मी आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.