नवी दिल्ली – आयपीएल-2020 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने चांगली कामगिरी केली. पण या संघाला प्ले ऑफमध्ये काही पोहोचता आले नाही. आयपीएलच्या या हंगामात किंग्ज इलेव्हन सहाव्या स्थानावर राहिली. संघाने सहा सामन्यात विजय मिळवला. या हंगामात कर्णधार केएल राहुल आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची जोडी पुढील हंगामात देखील कायम राहिल. पण संघातील काही खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
यात विदेशी खेळाडूंचा समावेश असल्याचे समजते. पुढील हंगामात मॅक्सवेल आणि शेल्डन कॉट्रेल यांना डच्चू मिळू शकतो. मॅक्सवेलसाठी 10.75 कोटी मोजले होते. तर कॉट्रेलसाठी 8.5 कोटी मोजले होते. जेम्स निशमलादेखील कमाल करता आली नाही. किंग्ज इलेव्हन पंजाबचे मालक हे राहुल आणि अनिल कुंबळे यांची जोडी 2021 च्या हंगामात कायम ठेवणार आहेत. कारण पुढील आयपीएल सहा महिन्यांच्या आत होणार आहे.
राहुलने या हंगामात सर्वाधिक धावा केल्या त्याच बरोबर संघाला देखील चांगले नेतृत्व दिले. राहुलला अन्य खेळाडूंची म्हणावी तशी साथ भेटली नाही. प्रशिक्षक कुंबळे यांना एक चांगली टीम भेटली आहे जी पुढील हंगामात शानदार कामगिरी करू शकते.
राहुल, मयांक अग्रवाल, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, ख्रिस गेल, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सारख्या खेळाडूंना 2021 च्या संघात स्थान मिळू शकते. पण मधली फळी आणि गोलंदाजी थोडी कमकूवत वाटते. त्यामुळे काही बदल होऊ शकतात.
अशा परिस्थितीत ग्लेन मॅक्सवेल याला संघातून डच्चू मिळू शकतो. त्याच्या बदली अन्य स्फोटक फलंदाजाला संधी मिळू शकते. संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या कामगिरीने मालक खुश आहेत. राहुलने फलंदाजीत कमाल केली. आता दुसऱ्या हंगामात तो शानदार खेळ करेल अशी त्यांना आशा आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध अंपायरने शॉर्ट रन दिली नसती तर संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला असता. या वर्षी पंजाबला एक कोअर टीम मिळाली आहे.