‘किंग खान’ लवकरच करणार २ चित्रपटांची घोषणा

मुंबई – बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसला नाही. ‘झिरो’ चित्रपटानंतर त्याचा कोणताही चित्रपट झळकला नाही. त्याने आत्तापर्यंत कोणत्या चित्रपटाची घोषणाही केलेली नाही. त्यामुळे त्याच्या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये मोठी आतुरता पाहायला मिळतेय.

सोशल मीडियावर विविध हॅशटॅग वापरून शाहरुखला चित्रपटाच्या घोषणेसाठी मागणीही करण्यात येत आहे. मात्र, आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शाहरुख एक नाही, तर दोन चित्रपटांची घोषणा लवकरच करणार आहे.

होय, शाहरुखचा २ नोव्हेंबरला ५४ वा वाढदिवस आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आगामी चित्रपटांची घोषणा करणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटामध्ये तो भूमिका साकारणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. तर, एस. शंकर यांच्याही एका चित्रपटात त्याची वर्णी लागली आहे.

काही दिवसांपूर्वीच शाहरुखने एका कार्यक्रमात सांगितलं होतं, की लवकरच तो त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहे. सध्या तो चित्रपटाच्या कथानकावर काम करत आहे. त्यामुळे त्याच्या वाढदिवशी तो चाहत्यांना सरप्राईझ देऊ शकतो, अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.