छत्तीसगड – देशातील आरोग्य सेवेची हेळसांड हा काही आपल्याकडे नवीन प्रश्न नाही. सरकारी आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार गरीब जनतेची पायपीट करतो हे या जनतेच्या पाचवीलाच पुजली आहे. छत्तीसगडमधील कोरिया जिल्हातून अशाच घटनेने ही दुरवस्था पुन्हा चव्हाटय़ावर आणली आहे. या घटनेमुळे छत्तीसगडमधील ढासळत चाललेल्या आरोग्य व्यवस्थेचे चित्र समोर आले आहे. येथील जिल्हा रुग्णालयात डॉक्टर हजर नसल्यामुळे रुग्णाला त्याच्या नातेवाईकांनी थेट स्ट्रेचरवरून डॉक्टरच्या घरी घेऊन गेल्याचे समोर आले आहे. या रुग्णाचा स्ट्रेचरवरून जात असतानाचा एक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
कोरिया जिल्ह्यातील बैकुंठपूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे चित्र जिल्हा रुग्णालयाबाहेरील असल्याचा दावा केला जात आहे. येथील एका व्यक्तीची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात आले. यानंतर कुटुंबीयांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात डॉक्टर गैरहजर होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात डॉक्टर न सापडल्याने रुग्णाला स्ट्रेचरवरून कुटुंबीयांनी थेट डॉक्टरांच्या घराकडे धाव घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हापासून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर टीकेची झोड उठली आहे.
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाकडून निवेदनही जारी करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन केएल ध्रुव यांनी सांगितले की, कुटुंबीयांना डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा होता.त्यामुळे त्यांनी स्वतः रुग्णाला नेले. त्या रुग्णाला पुन्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.ओपीडी बंद केल्याची माहिती नसल्याचे त्यांकडून सांगण्यात आले होते.