पाकिस्तानात खलिस्तानी दहशतवादी ‘हॅपी पीएच’डीची हत्या

आर्थिक वादातून स्थानिक गटाकडून हत्या

लाहोर : पाकिस्तानात खलिस्तान लिबरेशन फोर्सच्या टॉपच्या दहशतवाद्याची हत्या झाली आहे. आर्थिक वादातून स्थानिक गॅंगनेच ही हत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व प्रकरण अंमलीपदार्थाच्या तस्करीशी संबंधित आहे. पाकिस्तानातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हरमीत सिंग असे या मृत दहशतवाद्याचे नाव आहे.

सोमवारी दुपारी लाहोर जवळच्या डेरा चाहल गुरुद्वाराजवळ ही हत्या करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. 2016-2017 साली पंजाबमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याची हत्या झाली होती. हरमीत या कटामध्ये सहभागी होता. भारतातील अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. शस्त्रास्त्रांची तस्करी आणि पाकिस्तानातून ड्रग्सचा पुरवठा असे गुन्हे त्याच्या नावावर होते.

हरमिंदर मिंटू केएलएफचा प्रमुख होता. पंजाब पोलिसांनी 2014 साली थायलंडमधून त्याला अटक केली. त्यानंतर केएलएफची सूत्रे हरमीत सिंगकडे होती. मिंटू अन्य आरोपींसोबत नाभा तुरुंगातून निसटलाही होता. पण पुन्हा त्याला अटक करण्यात आली. एप्रिल 2018 मध्ये कार्डीऍक अरेस्टने त्याचा मृत्यू झाला.

हरमीत सिंग अमृतसर छेहरटामध्ये रहायला होता. त्याने डॉक्‍टरेटची पदवी मिळवली होती. त्यामुळे त्याला पीएचडी म्हटले जायचे. गेल्या दोन दशकांपासून तो पाकिस्तानात राहत होता. ऑक्‍टोबर महिन्यात भारताच्या विनंतीवरुन इंटरपोलने वेगवेगळया देशात राहणाऱ्या आठ खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. हरमीत सिंगचे नावही या यादीमध्ये होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.