चंद्रपुर : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धामणगाव येथे नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या खुनाचे कारण अद्याप समजु शकले नाही. घटनास्थळी गोंडपिपरी पोलीस दाखल झाले असून, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. उज्वल गेमाजी खेडेकार असे मृत मुलाचे नाव आहे.
गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाखाली उज्वल गेमाजी खेडेकार या नऊ वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
उज्वलच्या गळ्याला दुपट्टा आवळलेला होता. दरम्यान घटनेची माहिती गोंडपिपरी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहेत.