कर्नाटक : कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. येथे एका महिलेने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्वतःच्या पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, पतीच्या मृत्यूनंतर चार महिन्यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून पतीचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पोस्टमोर्टमला पाठवला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. याबाबत मृत व्यक्तीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत व्यक्तीच्या आईने फिर्यादीत असं म्हटलं आहे की, माझ्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुलाच्या पत्नीनेचे हे कृत्य केले असा आरोप तिने केला आहे. मृत पतीचे नाव सुरेश होते आणि तो नेहरू नगरचा रहिवासी होता. त्याचे वडील सरकारी नोकरीत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर सुरेश अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरीत लागला. सुरेशच्या आईने पतीची नोकरी मुलाला दिली.
त्यानंतर सुरेशने मोलकालमुरू तालुक्यातील तहसील कार्यालयात कामाला सुरुवात केली. त्याचा पत्नीसोबत वाद सुरू होता त्यामुळे तो आई आणि घरच्यांपासून वेगळा राहायचा. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरेशचा मृत्यू झाला. त्यावेळी घरच्यांना काही न कळवता पत्नी नागरत्नाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ही गोष्ट पतीच्या घरच्यांना कळली तेव्हा सुरेश आजारी पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पत्नीने सांगितले होते.
सरकारी नोकरीसाठी केली हत्या
दरम्यान, सुनेने माझ्या मुलाची हत्या केली असा आरोप मृत सुरेशच्या आईने केला. सून नागरत्नाने माझ्या मुलाचा खून करून त्याला आजार झाल्याचे नाटक केले. पतीची सरकारी नोकरी मला मिळेल या हेतूने तिने हत्या केल्याचे बोलले जात आहे. या प्रकारानंतर मृताच्या घरच्यांनी पोलीस आणि लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अंत्यसंस्काराच्या ४ महिन्यांनी पोलिसांनी क्रबिस्तानात जाऊन दफन केलेला सुरेशचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमोर्टमला पाठवला आहे. पोलीस पोस्टमोर्टम अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतरच या घटनेचे खरे कारण समोर येणार आहे.