श्रीनगर – दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या जवानांना 2 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. या चकमकीनंरीत घटनास्थळावरून शस्त्र आणि अन्य स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून शोधमोहीम अद्यापही सुरू आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियान जिल्ह्यातील हिंदसीतापूर भागात काही दहशतवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती लष्कराला मिळाली. त्यानुसार जवानांनी परिसराची नाकेबंदी केली आणि शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तरात लष्कराच्या जवानांनी जशास तसे उत्तर दिले आणि दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यापूर्वी, शुक्रवारी सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत इश्फाक अहमद नावाचा एक दहशतवादी ठार झाला होता. त्याच्याकडेही मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळाला होता.
दरम्यान, रमजान महिना सुरू झाल्याने जम्मू-काश्मीरमधील लष्करी कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.