“स्क्रिप्ट दिली तेवढेच डायलॉग मारा’; डॉ. कोल्हे यांना आढळरावांचा टोला

मंचर -आपली पात्रता नाही, राज्याच्या राजकारणावर बोलायची. तुम्हाला लोकांनी निवडून दिले, तेवढे काम करा. जेवढी स्क्रिप्ट दिली तेवढेच डायलॉग मारा, असा टोला शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा नामोल्लेख टाळत लगावला.

लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे आढळराव पाटील त्यांच्या निवासस्थानी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, खेड घाट आणि नारायणगाव बायपास ही कामे 2017ला बंद पडली. 2018ला लोकसभेमध्ये केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी पाच बायपासची कामे प्रलंबित असलेली कामे माझ्या मागणीनुसार मंजूर केली.

त्यानंतर रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली; परंतु रस्त्यांच्या उद्‌घाटन कार्यक्रम जाहिरातीमध्ये महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टाळून कार्यक्रम केले जात आहे. माझ्या प्रयत्नांमुळे रस्त्यांचे काम सुरु झाले आणि उद्‌घाटनाला मला बोलविण्यात आले नाही.

“महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यामुळेच मुख्यमंत्री झाले”, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हटले. याला उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले “”तुमचे गृहमंत्री, पालकमंत्री आणि मंत्रीमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आहे.” मी पराभूत होऊनही मतदारसंघात रात्रंदिवस फिरत आहे. 

विद्यमान खासदारांना ते शक्‍य नाही म्हणून त्यांचा जळफळाट होत आहे. त्यांची अशी इच्छा आहे की मी मतदारसंघात फिरणे बंद करावे. खेड-सिन्नर रस्त्यावरील पाचही बायबासची टेंडर आणि मंजुरी माझ्या काळातली आहे. मी मंजूर केलेली कामे शेवटपर्यत आणली. 

ती करत असताना औदार्य दाखवा. मी केलेल्या कामांवर जाहिरातबाजी, स्टंटबाजी करु नका. नागरिक सुज्ञ आहेत. महाविकास आघाडी राज्यात व्यवस्थित चालू आहे. फक्त शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये व्यवस्थित नाही. त्याला कारणीभूत खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.