किरोन पोलार्डने एकाच षटकात सहा षटकार ठोकत, युवराज सिंगच्या विक्रमाशी केली बरोबरी…

वेस्ट इंडिज- वेस्ट इंडिज टी-20 संघाचा कर्णधार किरोन पोलार्डने श्रीलंका विरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात एक खास विक्रम केला आहे. त्याने एकाच षटकात सलग 6 षटकार ठोकत एक खास विक्रम तर केलाच, त्याचबरोबर युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने 9 विकेट्स गमावून 131 धावसंख्या उभारली. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने 60 धावांच्या आतच 4 गडी गमावले. या सामन्यात श्रीलंकेचा फिरकीपटू अकीला धनंजयने हॅट्ट्रिक घेवून सामन्याचा पासाच पलटवला. मात्र यानंतर किरोन पोलार्डने जे केले, ते इतिहासात नोंदवले गेले.

किरोन पोलार्डने सहाव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या अकीला धनंजयच्या एकाच षटकात सलग 6 षटकार ठोकले. हा कारनामा केल्यानंतर वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

या सामन्यात किरोन पोलार्डने केवळ 11 चेंडूचा सामना करताना 38 धावांची धुवाधार खेळी साकारली. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने 132 धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना फक्त 13.1 षटकांत 6 गडी गमावून 134 धावा काढत हे लक्ष्य पूर्ण केले. त्याचबरोबर 4 गडी राखून विजय संपादन केला. म्हणून वेस्ट इंडिज संघाने तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

किरोन पोलार्डने केली युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
किरोन पोलार्ड हा टी-20 आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात सलग 6 षटकार ठोकणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी भारताच्या युवराज सिंगने केली आहे. त्याने 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 विश्वचषकात अशी कामगिरी केली होती. युवराजने इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉड या गोलंदाजाच्या एका षटकात 6 षटकार लगावले होते. परंतु आता किरोन पोलार्डचा या यादीत समावेश झाला आहे.

आतापर्यंत आंतराष्ट्रीय क्रिकेट मधील सर्व प्रकारच्या क्रिकेट मध्ये एका षटकात सहा षटकार ठोकणारे दोनच फलंदाज होते. परंतु किरोन पोलार्ड हा आता तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाचा माजी खेळाडू हर्षल गिब्सने 2007 साली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अशी कामगिरी केली होती. त्याने नेदरलँड संघाविरुद्ध खेळताना डान वान बुन्जे या गोलंदाजाच्या एकाच षटकात सलग 6 षटकार ठोकले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.