पुणे – उपचारासाठी उधार घेतलेली रक्कम परत केल्यानंतरही आणखी पैशाचा तगादा लावत एकाचे अपहरण करण्यात आले. अपहरण करुन त्याला मारहाण केल्यानंतर कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी घेऊन पाच लाखाची रक्कम वटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात संदिप अहिर, रबिल व त्यांच्या दोन साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेंजहिल्स येथे रहाणाऱ्या एका 43 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार त्यांनी संदिप अहिर यांच्याकडून औषधोपचाराकरीत 60 हजार रुपये उधार घेतले होते. हे पैसे त्यांनी व्याजासहित परत केले होते. मात्र तरीही आरोपी त्यांचा पती प्रशांत केसकरला जीवे ठार मारण्याची धमकी देत आणखी पैशाची मागणी करत होते. त्यांच्या पतीने आरोपीला स्वत:चे एटीएम कार्ड दिले होते.
ते पतीने बंद केल्याचा रागही अहिरला होता. यामुळे तो वारंवार त्यांच्या पतीला फोन करुन पैशासाठी धमक्या देत होता. त्यांनी पैसे न दिल्याने अहिरने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केसकर यांचे खडकी ऍम्युनेशन फॅक्टरीच्या गेटवरुन अपहरण केले. यानंतर त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करुन हातपाय बांधून मारहाण केली.
तसेच केसकर यांच्याकडून घेतलेल्या कोऱ्या धनादेशावर जबरदस्तीने स्वाक्षरी घेण्यात आली. यानंतर धनादेश वटवण्यास देऊन पाच लाखाची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र धनादेश बाऊंन्स झाल्याने ते शक्य झाले नाही.