आरोपीस अटक
पिंपरी (प्रतिनिधी) – चाळीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण करून खून करण्यात आला. ही घटना दापोडी येथे रविवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
अब्दुलआहाद सय्यद सिद्दीकी (वय १८, रा. पिंपळे गुरव रोड, दापोडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. उमर नासीर शेख (वय २०, रा. खडकी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुलआहाद याचे शनिवारी (दि. ११) रात्री आठच्या सुमारास अज्ञातांनी अपहरण केले.
दरम्यान आरोपींनी फोनवर चाळीस लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलीस आरोपींचा माग काढत असताना अब्दुलआहाद याचा मृतदेह चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला आहे.