पुणे – आर्थिक व्यवहारांतून झालेल्या वादातून दोन तरुणांचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्यांना मारहाण करून नगर येथे सोडल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्या इतर साथीदारांवरही गुन्हा दाखल केला आहे.
प्रशांत लबडे (26) आणि अनिकेत वाळके (20, दोघेही रा. मु.पो. बेलवंडी, ता. श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाने हडपसर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 26 मार्च रोजी दुपारच्या सुमारास माळवाडी परिसरात आर्थिक वादातून फिर्यादी व त्याच्या मित्राला आरोपींनी कारमध्ये बसवून अपहरण केले. ते त्यांना हडपसर येथील कॅनॉलजवळ घेऊन गेले. तेथे मारहाण करून पुन्हा गाडीत बसवले. त्यानंतर ते दोघांना आकुर्डी येथील फ्लॅटवर नेले. तेथे दिवसभर जबरदस्तीने डांबून ठेवत मारहाण केली.
त्यानंतर 27 मार्च रोजी परत गाडीत बसवून हडपसर येथे फिर्यादीच्या मित्राला सोडले. परंतु, फिर्यादीला न सोडता ते त्याला पुन्हा गाडीतून नगर येथे नेले. पुणे ते नगर प्रवासात फिर्यादीच्या मोबाइलवरुन त्याच्या वडिलांना कॉल केला केला. दरम्यान, पुण्यात आल्यानंतर फिर्यादींनी हडपसर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने यांच्या पथकाने दोघांना नगर येथील बेलवंडी येथून अटक केली.