पुणे : एकमेकाकडे पहाण्याच्या वादातून हडपसर परिसरातील एका अल्पवयीन मुलाचे पाच जणांच्या टोळक्याने अपहरण केले होते. यानंतर त्याला नग्न करून कोयत्यासह बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. मुलगा बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी त्याच्या तोंडावर मुत्रविसर्जन केले.
हा धक्कादायक प्रकार 12 मार्च रोजी मांजरी परिसरात घडला आहे. मारहाण झालेला मुलगा सध्या बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी हडपसर पोलिसांनी विनीत सूर्यकांत बिरादार (वय, 19 रा. भेकराईनगर), शुभम राजाभाऊ जाधव (वय 19 रा.समर्थ नगर पिंपरी-चिंचवड ) देविदास ऊर्फ देवा घनशाम पाहणे वय, 21, रा. काळेपडळ हडपसर ), भारत विशाल राठोड (वय, 21 रा. कुंजीर वस्ती ) सलीम कलिंदर शेख (वय, 22 रा.घुले वस्ती मांजरी ) या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
मारहाण झालेल्या मुलाच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याप्रकरणी आरोपीं विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण झालेला मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत गोपाळपट्टी परिसरात राहतो.
शिवजयंतीच्या निमित्ताने साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरच्यांना सांगून तो बाहेर गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्यामुळे त्याच्या घरच्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान हडपसर बीट ‘मार्शल’ला एक मुलगा बेशुद्धावस्थेत मांजरी रेल्वे ट्रॅक जवळ सापडला होता. त्याला उपचारासाठी त्यांनी ससून रुग्णालयात दाखल केले होते. परंतु तो बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती.
दरम्यान मारहाण झालेल्या एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियातून पोलिसांच हाती लागला होता. यावेळी पोलिसांनी मुलाच्या घरच्यांना बोलावून व्हिडिओ दाखवला.
तेव्हा तो मुलगा त्यांचाच असल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर फिर्यादी महिलेने प्रत्यक्ष ससून रुग्णालयात जाऊन पाहिले असता मुलगा बेशुद्ध असल्याच आढळून आला. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.