खोदाई पुणे पालिकेची; खापर फुटतेय मेट्रोवर ! बाणेर ते शिवाजीनगर मार्गावरील प्रकार

पुणे – बाणेर-शिवाजीनगर रस्त्यावर एका बाजूला हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग 3 चे काम सुरू असतानाच; महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडूनही समान पाणी योजनेच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी या मार्गावर अनेक भागात खोदाई केली आहे. तसेच खोदाईनंतर रस्ता दुरूस्त न करताच तसाच ठेवल्याने या रस्त्यावर वारंवार कोंडी होत आहे. यासाठी पोलिसांकडून या पीएमआरडीए-मेट्रोकडे याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे, महापालिकेने या रस्त्यावर कोणत्याही खोदाईस परवानगी देऊ नये. तसेच समान पाणी योजनेच्या खोदाईनंतर लगेच रस्ते दुरूस्त करावेत, अशी मागणी पीएमआरडीएने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
काय आहे प्रकार…
महापालिकेकडून बाणेर-बालेवाडी भागात समान पाणी योजनेचे काम सुरू केलेले आहे. शहरात 30 एप्रिलनंतर सर्व प्रकारच्या रस्त्यांना खोदाईस मनाई असली तर समान पाणी योजनेचे काम सुरू असल्याने या विभागास खोदाईसाठी कोणतेही बंधन नाही. त्यामुळे, या कामासाठी वाहतूक, रस्ता, वर्दळ, असा कोणताही विचार न करता मनमानी पद्धतीने कुठेही खोदाई केली जात आहे. त्यानंतर, संबंधित रस्ता दुरूस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी तो तातडीनं दुरूस्त केला जात नाही. त्यातच, आधीच या मार्गावर बाणेर ते शिवाजीनगरपर्यंत मेट्रोचे खांब उभारणीचे काम वेगाने सुरू असल्याने रस्त्याच्या मधोमध बॅरीकेडिंग केलेले असून त्यामुळे रस्ता अरूंद झालेला आहे.
पीएमआरडीएकडे होतेय तक्रार
दरम्यान, या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिका, पोलीस आणि पीएमआरडीएच्या झालेल्या बैठकीत या रस्त्याची जबाबदारी पीएमआरडीएकडे देण्यात आली आहे. मात्र, समान पाणी योजना अथवा महापालिकेने इतर यंत्रणेस खोदाईस परवानगी दिल्यानंतर खोदाई करणाऱ्या ठेकेदारानेच खोदाई केलेला रस्ता दुरूस्त करणे आवश्यक आहे. मात्र, हे काम न झाल्यास पोलिसांकडून पीएमआरडीएला पत्र देऊन जबाबदार धरले जात आहे.





