मुंबई – शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु होते. राज्यातील अनेक शिवसैनिकांनी शिंदेंना पाठिंबा दर्शवला होता. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेला खिंडार पडले होते. आता एकनाथ शिंदे गटाकडून थेट भाजपमध्ये खिंडार पाडण्यात आले आहे. रविवारी भाजपच्या तब्बल 100 महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणूकीच्या तोंडावर हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रभाग क्रमांक 25 च्या भाजपा माजी वार्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासह 100 महिलांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाने चक्क भाजपचेच पदाधिकारी फोडले आहेत.
बोरिवली-मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम उपनगरात शिंदे गटाचे पक्ष वाढवण्याचा जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यानुसार, आज भाजपच्या 100 महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला. आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पहिल्या माजी नगरसेविका शितल मात्रे यांना फोडून शिंदे गटात पक्षप्रवेश केले होते.