नवी दिल्ली – क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) माध्यमातून घेण्यात येणाऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा या वेळी कर्नाटकात होणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने हे जाहीर केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वर्षीच्या आंतरविद्यापीठ स्पर्धा याच खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेचा भाग असणार आहेत.
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेचे हे दुसरे पर्व असून, पहिले पर्व भुवनेश्वर येथे पार पडले होते. दुसऱ्या वर्षी कर्नाटकाला आयोजनाचा मान मिळाला असून, बहुतेक स्पर्धा या जैन विद्यापीठाच्या मैदानावर होणार आहेत. येथे होऊ न शकणाऱ्या खेळांच्या स्पर्धा राज्यात विविध केंद्रांवर होतील. विद्यापीठ स्तरावरील क्रीडा गुणवत्ता शोधण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने या स्पर्धेला सुरवात केली असून, पहिल्या स्पर्धेत 158 विद्यापाठातील 3182 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्या वेळी द्युती चंद, श्रीहरी नटराज, वाहबिज भरुचा अशा आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता.
या वर्षीच्या 19 क्रीडा प्रकारात स्पर्धा होईल. गेल्यावर्षी 17 क्रीडा प्रकारात स्पर्धा झाली होती. योगासन आणि मल्लखांब या दोन नव्या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. तिरंदाजी, ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, तलवारबाजी, फुटबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, रग्बी, जलतरण, टेबल टेनिस, टेनिस, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती या अन्य क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश आहे. या वेळी 25 वर्षांखालील गटात जागितक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या निकषानुसार स्पर्धा घेण्यात येईल. एकूण चार हजार खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे.