पुणे – रग्बी इंडिया, स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलींच्या गटात कोल्हापूर अ संघाने विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत कोल्हापूर अ संघाने नाशिक संघाचा ४५-०० असा एकतर्फी पराभव करून विजेतेपद पटकावले. विजयी संघाकडून नम्रता १५, नेहा १०, तृप्ती १०, समृद्धी ५, अनुष्का ५ यांनी सुरेख कामगिरी केली.
याआधीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोल्हापूर अ संघाने मुंबई स्टेकर्स संघाचा २४-०५ असा तर, नाशिक संघाने ठाणे अ संघाचा २६-०५ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबई स्टेकर्स संघाने ठाणे अ संघाचा ५३-०५ असा पराभव तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र सरकार सह संचालक सुधीर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.