खेड ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

धोम-बलकवडीचे पाणी वृंदावन धरणात सोडण्याची मागणी

निष्क्रिय यंत्रणेवर कारवाई करावी
धोम-बलकवडी योजनेच्या पूनर्वसन प्रकल्पासाठी खेड बु।। मधील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतरही लाभक्षेत्रात येणाऱ्या खेड बु।। ला केवळ राजकीय साठेमारीमुळे आजपर्यंत पाणी मिळालेले नाही. यावर्षी भयंकर दुष्काळ पडलेला आहे, असे असूनही सिंचन विभागाशी याबाबत पत्रव्यवहार करूनसुद्धा सिंचन विभागाने खेड बु।। येथील वृंदावन धरणात पाणी सोडले नाही. त्यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा बिकट प्रश्‍न निर्माण झाला आहे. पाणीच नसल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यापासून जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधूनही त्यांनी आजपर्यंत याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे नाईलाजाने उद्या होणार्या मतदानावर बहिष्कार घालावा लागत आहे. मात्र याला कारणीभूत असणाऱ्या निष्क्रिय यंत्रणेवर कठोर कारवाई करण्यात यावी.

सातारा – खेड, ता. खंडाळा येथील ग्रामस्थांनी धोम-बलकवडी एक्‍सप्रेस कॅनॉलचे पाणी खेड बु।। येथील वृंदावन धरणात सोडण्याची मागणी केली होती. तरीही संबंधित विभागाने खेड बु।। ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखवली होती. दरम्यान, खेड बु।। ग्रामस्थांनी वृंदावन धरणात पाणी न सोडल्यास उद्या होणाऱ्या लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठराव घेतला होता. वारंवार अल्टिमेटम देवूनसुद्धा सिंचन विभागाने खेड बु।। ग्रामस्थांच्या मागणीला ठेंगा दाखवल्यामुळे खेड बु।। ग्रामस्थही उद्या प्रशासनाला ठेंगा दाखवून निवडणूक मतदानावर बहिष्कार घालणार आहेत. सुमारे 40 वर्षांपूर्वी खेड बु।। येथील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांसाठी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र असे असूनही ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर लाभक्षेत्रात असलेल्या खेड बु।। ला धोम-बलकवडीचे पाणी अद्याप मिळालेले नाही. सध्या खंडाळा तालुक्‍यात मोठा दुष्काळ पडलेला आहे.

दुष्काळामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न बिकट बनलेला आहे.
या पार्श्‍वभूमीवर खेड बु।। येथील ग्रामस्थांनी सध्या कालव्यातून सुरु असलेले आवर्तनाचे पाणी तुळशी वृंदावन धरणात सोडावे, अशी मागणी केली होती. मात्र, याबाबतचे निवेदन सिंचन विभाग यांना देण्यात आले होते. मात्र सिंचन विभागाकडून ग्रामस्थांना ठेंगा दाखविण्यात आल्याने ग्रामस्थांनी यासंबंधी ग्रामसभा घेवून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठराव संमत केला.

आपल्या मागण्या व ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी सातारा, राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग, तहसीलदार, प्रांत तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणंद यांना देण्यात आलेल्या आहेत. परंतु एवढा खटाटोप करुनही जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली न गेल्याने उद्या होणाऱ्या मतदानावर खेड बु।। ग्रामस्थ बहिष्कार घालणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिलेली आहे. खेड बु।। ग्रामस्थांच्या या पवित्र्यामुळे मात्र जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडालेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.