पवारांचे विश्वासू असल्याने आमदार मोहितेंना मंत्रिपद मिळण्याची कार्यकर्त्यांना आशा
रोहन मुजूमदार
पुणे – महाराष्ट्राची विधानसभा अस्तित्वात आल्यापासून ते आजपर्यंत जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ सोडून सगळ्या मतदारसंघाला कोणत्या ना कोणत्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली; पण खेड कायमच वंचित राहिला आहे. मात्र, अनुभवामुळे अन् शरद पवारांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून यंदा तरी आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या रूपाने तालुक्याला “लाल दिवा’ मिळेल, अशी आस मोहिते पाटील समर्थकांसह खेड तालुकावासीयांना आहे.
लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपचा वारू उधळत होता, त्याच पद्धतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते एक हाती निवडून येतील, असा विश्वास जवळपास सगळ्यांनाच होता. दरम्यान, निवडणुका पार पडल्यावर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तरी मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने त्यांना “खो’ दिला अन् राज्यात नवीन राजकीय समीकरणाचा उदय झाला. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा पक्ष राहिलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. अशी वेळ भाजपवर येणार, हे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते. मात्र, राज्यातील नवीन समीकरण उदयाला आणण्यात एकच नाव पुढे आले आणि ते म्हणजे शरद पवार. त्यांच्या याच भूमिकेमुळे राजकारणातील “बाप-माणूस’ म्हणून त्यांची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
खेड-आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते नावांचा हिरा शरद पवार यांनी शोधला. या संधीचा दिलीप मोहिते यांनी परिपूर्णपणे लाभ घेतला. या हिऱ्याच्या कामगिरीवरच त्यांना 2004 मध्ये प्रथम आमदारकीचे तिकिट मिळाले. या संधीचे सोने करीत त्यांनी मतदारसंघात विकास कसा असतो हे दखवत 2004 ते 2014 असे सलग 10 वर्षे आमदकीच्या माध्यमातून जनसेवा करून शरद पवारांनी शोधलेला पैलू समाजकारणात कसा “लखलखला’, हे दाखवत पवारांचा दृढ विश्वास संपादन केला.
मात्र, 2014 मध्ये “मोदी’ लाटेमध्ये या हिऱ्याचा बुरुज ढासळला अन् त्यांचे आमदारकीपद गेले. मात्र, तरीही दिलीप मोहिते यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही की पवारांनीही त्यांचा हात सोडला नाही. उलट वेळोवेळी त्यांच्या डोक्यावर हात ठेवत मार्गदर्शन केले. याच मार्गदर्शनाच्या जोरावर त्यांनी 2019मध्ये पुन्हा एकदा आमदारकी आपल्याकडे खेचून आणली, त्यामुळे पवारांचा “हिऱ्या’वर असलेला विश्वास अन् अनुभावाच्या जोरावर यंदा तरी मोहितेंना मंत्रिपद देतील, असा विश्वास दिलीप मोहिते
समर्थकांना आहे.
जयंत पाटलांचा शब्द खरा ठरणार!
दिलीप मोहिते यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी वाडा येथे सभा घेतली होती. यात ते म्हणाले होते की, दिलीप मोहितेंना तुम्ही निवडून द्या, सत्ता आल्यास राज्य सरकारमध्ये त्यांना विशेष स्थान देऊ. मोहिते पाटील हे गेली अनेक वर्षे विकासकामांत अग्रेसर राहिले आहेत. पक्षाची सत्ता नसताना देखील कठीण काळात पक्षनिष्ठा व त्यांचा जनसंपर्क विकासकामांबाबतचा त्यांचा अनुभव पाहता त्यांना नव्या सरकारमध्ये विशेष स्थान देऊ, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला होता, त्यामुळे पाटलांची भविष्यवाणी खरी ठरणार, अशी मोहिते पाटील समर्थकांना आशा आहे.
शेवटच्या निवडणुकीचा “मंत्रिपदा’ने गोड व्हावा –
ऐतिहासिक वारसा, पर्यटन स्थळे, निसर्गसंपदने नटलेला, औद्योगिक वसाहत लाभलेला, धार्मिक स्थळे असलेला तालुका म्हणून खेड तालुक्याची ओळख आहे, तरीही तालुक्याला मंत्रिपद का मिळाले नाही, अशी चर्चा तालुक्यात आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील दहा वर्षे आमदार असताना त्यांनी विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बाजार महासंघाचे अध्यक्षपद या सर्व पदांवर काम करत असताना त्यांनी त्या पदांना अगदी योग्यरीतीने न्याय देत असताना त्यांनी तालुक्याकडे दुर्लक्ष न करता विकसाच्या “झोतात’ आणला. मात्र, यंदा माझ्या कारकिर्दीतील शेवटची निवडणूक आहे, असे त्यांनी प्रचारात जाहीर केले आहे, त्यामुळे किमान शेवटच्या निवडणुकीचा “मंत्रिपदा’ने गोड व्हावा, अशी खेडच्या जनतेसह कार्यकर्त्यांना अशा आहे.