खेड शिवापूरची टोलवसुली थांबणार?

दोन दिवसांत जिल्हाधिकारी देणार निर्णय

कापूरहोळ – खेड शिवापूर टोलनाका पीएमआरडीए हद्दीतून बाहेर हलविणे आणि पुणे-सातारा महामार्गाच्या रस्त्याची कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करणे या दोन प्रमुख मागण्यांवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम माहिती घेऊन दोन दिवसांत निर्णय देणार आहेत.

पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली आज (रविवारी) टोल नाका स्थलांतराबाबत बैठक झाली. यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी रिलायन्स इन्स्फ्राच्या रस्ते व पुलांच्या कामाबाबत अनेक त्रुटी जिल्ह्धिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच टोलनाका पीएमआरडीए हद्दीबाहेर दोन किलोमिटर स्थलांतरीत व्हावा, जोपर्यंत कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोलवसुली थांबवली जावी, अशी मागणी कृती समिती व सर्वपक्षीय शिष्टमंडळाने एकमुखाने लावुन धरली. दोन-तीन तास चाललेल्या या वादळी बैठकीत जनभावना तीव्र होत्या. आजी माजी आमदारांनीही टोल नाका हटवण्यावर व कामे होत नाहीत तोपर्यंत टोल वसुलीस स्थगितीवरच जोर दिला.

या बैठकीस आमदार संग्राम थोपटे, भीमराव तापकीर, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजितसिंह पाटील, हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, रिलायन्स इन्फ्राचे व्यवस्थापक टी. एन. सिंग, पुणे-सातारा टोल रोडचे अमित भाटीया, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, दिलीप बाठे, माऊली दारवटकर, डॉ. संजय जगताप, पोपट जगताप, विलास बोरगे, अमोल पांगारे, ज्ञानेश्‍वर शिंदे, लहू शेलार, दादा पवार, चंदू परदेशी, आणि कृती सामितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, या रस्त्याच्या कमासंदर्भात अनेक बैठका झाल्या आहेत; मात्र त्यानुसार रिलायन्स इन्फ्राने समाधानकारक काम केले नाही. त्यावर “एनएचएआय’चे नियंत्रण नाही. या दोन्ही मागण्यांवर कायदेशीरपणे विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. सर्वांच्या प्रक्षोभक भावना लक्षात घेऊन, आजच्या बैठकीचा टोल बंदीचा ठराव करून लवकरच केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले. चेलाडी ब्रीज, वरवे ब्रीज, सारोळे ब्रीज यांची कामे पूर्ण करण्याच्या तारखा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी दिल्या. त्या तारखांच्या दिवसापर्यंत ही कामे पूर्ण न झाल्यास कारवाई करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

या बैठकीत स्थानिकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना रिलायन्स आणि एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना समाधान कारक उत्तरे देता आली नाहीत. तर जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांचा लेखी अहवाल दोन दिवसांत कृती समितीला व लोक प्रतिनिधींना देण्यात येणार आहे. या बैठकीचे व्हिडीओ चित्रीकरण, फोटोशूट व रेकॉर्डिंग करण्याची परवानगी देण्यात आली होती.

निर्णयानंतर आंदोलनाची दिशा
खेड-शिवापूर टोल नाक्‍यावरील टोलवसुली बंद करणे आणि खेड-शिवापूर टोलनाका भोर हद्दीबाहेर कायमचा घालवणे या शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीच्या मागण्यांवर जिल्हाधिकारी निर्णय देतील. या निर्णयानंतर “शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती’च्या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.