खेड-शिवापूूर : खेड-शिवापूूर येथील पुणे – सातारा रस्त्यावरील खेड – शिवापूर टोल नाका भोर तालुक्याच्या किंबहुना पीएमआरडीए हद्दीच्या बाहेर हटविण्यात येणार नाही, असा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. अशी माहिती पुणे-सातारा महामार्ग व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली. मात्र असा कोणताही निर्णय एनएचएआयने घेतलेला नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच टोलनाका हटविण्याचा निर्णय होईल, असे एनएचएआयचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले. तर टोलनाका हटाव कृती समितीने सांगितले की, चुकीची माहिती देऊन टोल प्रशासन सर्वांची दिशाभूल करत आहे. मागील बैठकीत त्यावेळी आंदोलनाच्या बैठकीत हवेली, पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर या तालुक्यातील वाहनांना टोल फ्री सोडण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला होता.
गेल्या चार महिन्यांपूर्वी टोलनाका हटाव समितीने केलेल्या आंदोलनाला चार महिने उलटून गेले मात्र अजूनही मंत्री गडकरी यांच्यासोबत टोलनाका पुढे हटवायचा किंवा नाही याबाबत बैठक झालेली नाही. त्यामुळे निर्णय काय झाला याबाबत साशंकता होती. यासाठी टोलनाका प्रशासनाशी संपर्क साधला असता खेड-शिवापूर टोलनाका पुढे हटविण्यात येणार नाही असा निर्णय एनएचएआयने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे-सातारा रोडचे मुख्य अभियंता एनएचएआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात असतात त्यांनी टोलनाका त्या ठिकाणावरून हटणार नाही असे सूतोवाच दिले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाकडून असे कोणतेही पत्रक आम्हाला मिळाले नाही. त्यामुळे आम्ही सध्या तरी मागील बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचे पालन करत आहोत. एनएचएआयकडून अधिकृत पत्रक आल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल.
– अमित भाटीया, व्यवस्थापक, पुणे-सातारा टोल रोड.
करोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही कोणताच निर्णय झालेला नाही, त्यामुळे रिलायन्स इन्फ्रा जे काही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे, ते निषेधार्ह आहे. बैठक झाल्यानंतर निर्णय होईलच. त्यामुळे ठेकेदाराने कोणताही निर्णय घेणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. या अफवेमुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे.
-माऊली दारवटकर, निमंत्रक, टोलनाका हटाव कृती समिती.