खेड शिवापूर (वार्ताहार) – राजगड पोलीस स्टेशन हद्दीत 11 मार्चला पेट्रोल पंपावर पिस्तुलचा धाक दाखवून 2 लाख 30 हजारांची लूट करणाऱ्या दोघांपैकी एकाला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, खेड शिवापूर येथील एल. कुडळे अँड सन्स या पंपावर 11 मार्चला रात्री 12 वाजून 3 मिनिटांनी दोन जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून 2 लाख 30 हजारांची चोरी केली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज, तसेच तांत्रिक विश्लेषणातून आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे रामधन भागीरथी विश्वकर्मा (रा. संतोष नगर, कात्रज, पुणे) याच्या राहत्या घरी उत्तरप्रदेशची दोन मुले आली होती आणि त्यांच्याकडे पिस्टल होते, अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
यानंतर रामधन विश्वकर्मा याचा शोध घेतला असता आज (दि. 17) दत्तनगर चौक, कात्रज पुणे येथून एकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे पूर्ण नाव रामधन भागीरथी विश्वकर्मा (वय 39, रा. संतोष नगर, कात्रज, पुणे, मूळ राहणार सोहिला, पोस्ट लालगंज, जि. बस्ती,उत्तर प्रदेश) असे सांगितले आहे.
त्याने त्याचे 2 साथीदार राजसिंग ऊर्फ राजकुमार (वय 20, रा. कबरा, जि. बस्ती, उत्तर प्रदेश), सूरजकुमार, (वय 18 पूर्ण, रा. कबरा, जि. बस्ती, उत्तरप्रदेश) यांच्यासह मिळून मोटार सायकल (एमएच 12 क्यूएन 9801) वर जाऊन हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना दिली. या गुन्ह्यातील संशयित आरोपी राजसिंग, तसेच सूरजकुमार फरार असून रामधन विश्वकर्मा यास ताब्यात घेतले आहे. पुढील तापसासाठी त्यास राजगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
त्याचेकडून हा गुन्हा केल्याचे उघडकीस आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते, पोलीस उपअधीक्षक पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गोरे, राजू मोमीन, अमोल शेडगे, मंगेश भगत, अक्षय नवले, अक्षय जावळे, प्रमोद नवले, राजेंद्र थोरात, ज्ञानेश्वर क्षीरसागर, गुरू जाधव, प्रसन्न घाडगे या पोलीस पथकाने केला.