राजगुरूनगर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात आज खेड शिवसनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. ( central government fuel price hike )
देशात करोनाच्या महामारीमुळे सर्ववसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. डिझेल पेट्रोलच्या किमती वाढल्याने महागाईचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य नागरिकाला जगणे अवघड झाले आहे. महागाई मुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. केंद्राने डिझेल पेट्रोलच्या किमती नियंत्रणात आणाव्यात, त्यात वाढ करू नये या मागणीसाठी खेड तालुका शिवसनेच्या ( Shivsena ) वतीने आज (दि. 5) रोजी येथील तहसिलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी केले. यावेळी जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे, जेष्ठ नेते अशोक खांडेभराड, जिव्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, सदस्य अमर कांबळे, माजी सभापती अंकुश राक्षे, माजी उपसभापती ज्योती अरगडे, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, प्रकाश वाडेकर, राहुल गोरे,महिला संघटक उर्मिला सांडभोर, मारुती सातकर, लक्ष्मण तनपुरे, लक्ष्मण जाधव, किरण गवारे, गणेश प-हाड, श्रीनाथ लांडे, अंबर सावंत, दिलीप तापकीर, मछिंद्र गावडे, महेश शेवकरी, मनोहर गोरगले, बाबा इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी तालुका प्रमुख रामदास धनवटे म्हणाले, येथील सर्वसामान्य माणसाला विचारात न घेता केंद्र सरकारचा कारभार सुरु आहे.केंद्र सरकारचा कारभार अनागोंदी चालला आहे. हे आता सहन न होणारे आहे. महागाई वाढत असताना केंद्र सरकार सकारात्मक भूमिका घेत नाही. केंद्र सरकारने डिझेल पेट्रोल वाढ रद्द करून ते वाजवी दरात उपलब्ध करावी.सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणाऱ्यांमध्ये शिवसेना ठाम आहे. डिझेल, पेट्रोल दरवाढ कमी झाली नाही तर तीव्र आंदोलन आगामी काळात केले जाईल.
शिवसेनेचे जेष्ठ नेते अशोक खांडेभराड म्हणाले, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्र सरकार करत आहेत. शेतकरी विरोधी धोरण सरकार राबवित आहे. पेट्रोल दरवाढीने देशात महागाई वाढत आहे. या सरकारला वेळीच विरोध केला नाही तर पेट्रोल डिझेल वाढ थांबणार नाही. महागाईचा भडका उडेल. करोना मुळे देशातील जनता अगोदरच बेजार झाली आहे. सरकराने वेळीच लक्ष दिले नाहीत तर शिवसेना तीव्र आंदोलन करेल.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मागण्यांचे निवेदन तहसीलदार कार्यालयातील कारकून बाळासाहेब जाधव सतीश धस याना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.