राजगुरूनगर – खेड शिक्षक पतसंस्था निवडणुकीची फेरमतमोजणी होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा पदवीधर व केंद्र सभा अध्यक्ष शांताराम नेहेरे यांनी दिली. खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित खेड, संचालक मंडळ निवडणूक 2016 ते 2021 निवडणूक दोन गटांची फेरमतमोजणी होणार आहे.
या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 14 ऑगस्ट 2016 रोजी झाली होती. या निवडणुकीत कुडा व चास गटातील सर्वसाधारण उमेदवार अशोक सावंत- 603 मते, अविनाश शिंदे – 604 मते, चास गटात मधुकर गिलबिले – 604 मते, सुभाष मुळुक -605 मते पडली होती.
यात दोन्ही ठिकाणी उमेदवारांच्या मतात केवळ 1 मताचा फरक असल्याने सहकार पॅनलच्या वतीने शांताराम नेहेरे यांनी मतमोजणी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांकडे फेरमतमोजणी कामी रीतसर अर्ज केला होता; मात्र तो अर्ज नाकारून फेरमतमोजणी झाली नव्हती.
या अन्यायाविरुद्ध ऑक्टोबर 2016 मध्ये पुणे येथील जिल्हा सहकारी संस्था न्यायालयात फेरमतमोजणी कामी अशोक सावंत व मधुकर गिलबिले यांनी दावा दाखल केला होता. या प्रकरणी नुकतीच सुनावणी झाली. त्यानुसार 18 फेब्रुवारी 2021 सकाळी 11.30 वाजता जिल्हा सहकारी संस्था न्यायालय पुणे येथे कोर्ट कमिशनर यांच्या देखरेखीखाली मतमोजणी होणार आहे.